नांदेड। नागरी सुविधांचा अभाव असलेल्या नगरातील समस्या तातडीने सोडवून उपाययोजना कराव्यात यासाठी माकपचे शिष्टमंडळ २२ मे रोजी महापालिका आयुक्तांना भेटून निवेदन देण्यासाठी गेले असता आयुक्त श्री महेशकुमार डोईफोडे उपस्थित नसल्याने अतिरिक्त आयुक्त श्री गिरीष कदम यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.
शहरातील देगलूर नाका भागातील मिल्लत नगर येथे किमान ३० वर्षांपासून नागरिक पक्के घरे बांधून वास्तव्यास आहेत. परंतु तेथे नागरी सुविधा अजूनही पोहचल्यात नाहीत.म्हणून तेथील नागरिकांनी दि.१८ मे रोजी लोकविकास समन्वय संघर्ष समितीचे समन्वयक कॉ.उज्वला पडलवार आणि कॉ. गंगाधर गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेऊन अनेक तक्रारिंचा पाढा वाचला होता. तेथे
प्रचंड घाणीचे साम्राज्य आणि महापालिकेची उदासीनता पाहता पावसाळापूर्व कामाना गती देणे आवश्यक आहे. रिकाम्या प्लॉट्सवर कचऱ्याचे ढिगारे आणि सहन न होणारी दुर्गंधी ही रोगराईस निमंत्रण देत असून पहिल्या पावसातच साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होणार आहे.
मिल्लत नगर येथे नाली,रस्ते, पाणी, लाईट,अंगणवाडी,शाळा, रेशन दुकान सह अनेक सुविधांचा अभाव आहे. तेथील मागण्या तातडीने सोडवाव्यात तसेच नमस्कार चौक येथे सार्वजनिक सौचालय बांधण्यात यावे. एमजीएम कॉलेज समोरील बजरंग कॉलनी येथे बोअर (हात पंप) मंजूर करावेत.शहरातील इतरही भागात नागरी सुविधा पुरवाव्यात आदी मागण्याचे निवेदन देण्यात आले. अतिरिक्त आयुक्त गिरीष कदम यांनी शिष्टमंडळा सोबत सविस्तर चर्चा करून अत्यावश्यक सुविधा तातडीने सोडवू असे आश्वासन दिले.
या शिष्टमंडळात कॉ.उज्वला पडलवार, कॉ.गंगाधर गायकवाड यांच्यासह कॉ.करवंदा गायकवाड, कॉ.लता गायकवाड,कॉ.मारोती केंद्रे,फरहीन खान म.रहेमान खान, लतीफा बी, सलिमा बी,रमजानी बी, ताहेरा तबसूम, नूरजा पठाण, शहाणाज बेगम, बालोबी सय्यद नसीरोद्दीन,अन्वर बेगम,आदींचा समावेश होता. तातडीने मागण्याची पूर्तता झाली नाही तर जून च्या पहिल्या आठवड्यात मोठे आंदोलन छेडण्यात येणार असून पूरग्रस्तांचे मंजूर अनुदान वाटप करावे ही मागणी देखील घेण्यात येणार आहे.