जिल्हयात टंचाई निवारण्याच्या आवश्यक सुविधा बहाल : जिल्हाधिकारी; टंचाईग्रस्त नागरिकांनी संपर्क साधण्याचे आवाहन
नांदेड। नांदेड जिल्ह्यामध्ये टंचाई निवारण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून अनेक गावांना पिण्याची पाणी टंचाई जाणवणार नाही. यासाठी आवश्यक सोयी सुविधा करण्यात आलेल्या आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक उपविभागीय अधिकाऱ्यांना या संदर्भात अधिकार दिले असून कुठेही टंचाई असेल तर नागरिकांनी थेट संपर्क साधण्याच्या आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
९८ नळ योजनांची दुरुस्ती
नांदेड जिल्हयातील पाणी टंचाई निवारणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या वर्षी एकूण ९८ – नळ योजना विशेष दुरुस्तींच्या प्रस्तावांना, ३१ – तात्पुरती पूरक नळ योजनेच्या प्रस्तावांना व ५७३ – नविन विंधण विहीरींच्या प्रस्तावांना प्रशासकीय मंजूरी देण्यात आली असून त्यापैकी बहुतांश कामे पूर्ण होवून सदर गावामध्ये टंचाई कालावधीमध्ये पाण्याचा पुरवठा सुरु झालेला आहे.
टॅंकरचे प्रस्ताव निकाली
तसेच उर्वरित टंचाई निवारण योजनांची कामे युध्दपातळीवर पूर्ण करण्यात येत आहेत. टंचाई कालावधीमध्ये विहीर,बोअर अधिग्रहण तसेच टॅंकरचे प्रस्ताव तातडीने निकाली काढून सदर गावामध्ये तात्काळ पाणी पुरवठा सुरु कर ण्यात आला आहे.
२१ खासगी टॅंकर मदतीला
विहीर व बोअर अधिग्रहण व टॅंकर मंजूर करण्याचे अधिकार नांदेड जिल्हयातील सर्व उप विभागीय अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील २१ गावे,/वाडी,तांडयामध्ये २१ खाजगी टॅंकरव्दारे व २७५ खाजगी विहीर,बोअर अधिग्रहणाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. टॅंकरची संख्या साधारणपणे मुखेड तालुक्यात – १४, कंधार – ५ माहूर – १ व भोकर तालुक्यात १ टॅंकरव्दारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तसेच टॅंकर व विहीर,बोअर अधिग्रहणाचे प्रस्ताव कुठल्याही स्तरावर प्रलंबित राहणार नाहीत याबाबत सर्व उप विभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार व सर्व गट विकास अधिकारी यांना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचेकडून सक्त निर्देश देण्यात आले आहेत.
चारा मुबलक प्रमाणात
नांदेड जिल्हयामध्ये जनावरांसाठी चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून कुठल्याही प्रकारची चारा टंचाई नाही. टंचाईग्रस्त गावातील टंचाई निवारणासाठी जिल्हाधिकारी श्री. अभिजित राऊत हे तालुक्याच्या ठिकाणी आढावा बैठका घेत आहेत.
टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा
तसेच तालुक्यातील टंचाईग्रस्त गावामध्ये टंचाई निवारण संदर्भात इतर संबंधित अधिकारी आढावा बैठका घेवून प्रत्येक बाबींबर लक्ष ठेवून आहेत.जिल्हयातील नागरिकांची पाणी टंचाईच्या अनुषंगाने कुठल्याही प्रकारची तक्रार असल्यास त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील टंचाई निवारण कक्षामधील दुरध्वनी क्रमांक ०२४६२-२३५०७७ व टोल फ्री क्रमांक १०७७ वर संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. सदर दुरध्वनी क्रमांक हे २४x७ चालू राहतील.