महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त डिजे विरहित शोभायाञेने वेधले लक्ष
उमरखेड, अरविंद ओझलवार। बाराव्या शतकातील आद्य क्रांतिकारक ,वीरशैव लिंगायत धर्म संरक्षक ,समतावादी चळवळीचे जनक, बाराव्या शतकातील अनुभव मंटपाच्या माध्यमातून स्त्रियांना समान अधिकार बहाल करणारे समाज सुधारक ,जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची ९१९ वी जयंती उमरखेड शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेची शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.कर्कश आवाजाच्या व डिजेच्या भव्य प्रदूषणाच्या या काळात महात्मा बसवेश्वरांची निघालेली डिजे विरहित शोभायाञा उमरखेड करांचे लक्ष वेधून घेत होती. शोभायात्रेत लहान मुला मुलींचे झेंडा पथक,वीरशैव लिंगायत महिला व पुरुष भजनी मंडळ ,बँड पथक, महात्मा बसवेश्वरांचा जयघोष करणारा युवा वर्ग ,पाऊली खेळणाऱ्या महिला, यामुळे चैतन्याचे वातावरण होते.
यात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस अनेकांनी अभिवादन केले.ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.शोभायात्रा महात्मा बसवेश्वर संस्थान, बसवलिंग स्वामी मठ, नाग चौक, छञपती शिवाजी महाराज चौक ,गांधी चौक, खडकपुरा, शहीद चौक ,सराफा लाईन आठवडी बाजार मार्गे काढून शेवटी महात्मा बसवेश्वर संस्थान शिव मंदिरात प्रसादाचे वाटप करून विसर्जित करण्यात आली .
प्रसंगी बोलताना माजी न.प. शिक्षण सभापती प्रकाशअप्पा दुधेवार यांनी महात्मा बसवेश्वरांचे विचार अंगीकारणे काळाची गरज असल्याचे सांगितले. अनुभव मंटप या जगातील पहिल्या लोकशाही संसदेच्या माध्यमातून महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकातच स्त्रियांना समान अधिकार दिले होते. अस्पृश्यता निवारण, जातीभेद निवारण, शिक्षण, असे महान कार्य करून महात्मा बसवेश्वरांनी धर्माच्या ग्लानीला आळा घालून धर्मप्रसाराचे व धर्म जागृतीचे कार्य सुद्धा केले. आज त्यांच्या विचार्यांनी वागणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी साठी महात्मा बसवेश्वर संस्थांचे अध्यक्ष व संचालक मंडळ सर्व महिला व पुरुष भजनी मंडळ व युवा वर्ग यांनी विशेष सहकार्य केले.