नांदेड। शहरात दिवसाढवळ्या एका सेवानिवृत्त बैंक कर्मचाऱ्यांस गोळीबार करून चोरट्यांनी नगदी रक्कमेसह मोबाईल बालज हिसकावून नेल्याची घटना आज घडली आहे. या घटनेमुळे शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे नांदेड शहरात चाललय काय ? असा प्रश्न सोशल मीडियावर नागरीकांनी उपस्थित केला आहे. आणि नांदेड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला असून, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष द्यावे अशी मागणी केली जाते आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदेड शहरातील भावसार चौक परिसरात येणाऱ्या अष्टविनायक नगर भागात राहणारे रवींद्र रामराव जोशी वय 62 हे भारतीय स्टेट बैंकेतून आपली सेवानिवृत्त पगार उचलून घराकडे येत होते. दरम्यान घराच्या गेटजवळ येताच त्यांचा पाठलाग करणारे दोघे दुचाकीवरून आले आणि ज्येष्ठ नागरिक तथा सेवानिवृत्त बैंक कर्मचारी श्री जोशी यांच्या हातातून बैग हिसकावून घेतला. त्यांनी लगेच लुटणाऱ्या चोरट्यांना विरोध केला यात चोरटा खाली पडला, विरोध होत असल्याचे पाहून चोरट्यांनी तीन गोळ्या झाडून 40 हजार रुपये रोख रक्कम आणि एक मोबाईल बळजबरीने चोरून पलायन केले आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी भेट देऊन पहाणी केली, यावेळी मोठा पोलीसांचा फौजफाटा पोहोचला आणि दरोडेखोरांचा शोध सुरू केला आहे.
लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यापैकी एकास रवींद्र जोशी यांनी पकडून खाली पाडले. पण आपला विरोध होताना पाहून दरोडेखोरांनी तीन गोळ्या झाडल्याची घटना सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत. घटनेबाबत सांगितले जाते की, चोरटे रवींद्र जोशी यांनी बँकेतून पैसे काढल्याचे पाहून त्यांचा पाठलाग करत घरापर्यंत आले असावे असा अंदाज बांधला जात आहे. या घटनेत दरोडेखोरांनी झाडलेल्या तीन पैकी रवींद्र जोशी यांना दोन गोळ्या लागल्या असून, एक गोळी हाताला आणि एक पायाला लागली आहे. यात जखमी झालेल्या रवींद्र जोशी यांच्यावर नांदेडच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेचा तपास सीसीटीव्ही फुटेज व जखमीने दिलेल्या माहितीनुसार नांदेड पोलीस करत आहेत.