नांदेडमहाराष्ट्र
भव्य शंकरपट स्पर्धेचे आमदार जवळगावकर यांच्या हस्ते झाले शानदार उद्घाटन
हिमायतनगर,अनिल मादसवार। गेल्या दहा दिवसापासून सुरू असलेल्या हिमायतनगर येथे श्री परमेश्वराच्या महाशिवरात्री यात्रा उत्सवाला आता रंग चढू लागला आहे. आज दिनांक 18 रोजी शेतकरी व बळीराजासाठी महत्त्वाचा मानला जाणारा बैलगाडी शर्यतीचा कार्यक्रम म्हणजेच शंकरपट स्पर्धेची सुरुवात आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते उद्घाटन करून झाली आहे. पहिल्या दिवशी जवळपास 30 ते 40 स्पर्धकांनी या शंकरपट स्पर्धेत सहभाग घेतला शंकरपटाच्या मैदानावर धावणाऱ्या बैलगाडा शर्यतीच्या चित्त थरारक दृश्याने अनेकांचे डोळ्याचे पारणे फिटले आहे .
गेल्या दहा वर्षापासून हिमायतनगर येथील श्री परमेश्वरी यात्रेत शंकर पटाची स्पर्धा झाली नव्हती. त्यामुळे शेतकरी राजासाठी ठेवण्यात येणारी केवळ एकच पशुप्रदर्शन स्पर्धा होत होती शासनाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्यानंतर तब्बल अकरा वर्षानंतर हिमायतनगर येथील श्री परमेश्वर महाराजांच्या महाशिवरात्री यात्रेत शंकरपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेची तयारी जवळपास गेल्या महिन्याभरापासून शंकरपट समितीचे अध्यक्ष संतोष गाजेवार, ज्ञानेश्वर शिंदे व त्यांची टीम दिवस-रात्र मेहनत घेऊन करत होते. या स्पर्धेच्या सुरुवातीचा दिवस आज उजाडला असून, श्री परमेश्वर मंदिरापासून बँड बाजाच्या वाद्याच्या गजरात स्पर्धा ठिकाणापर्यंत भव्य अशी मिरवणूक करण्यात आली होती. या मिरवणुकीत शेतकरी मंदिर कमिटीचे सदस्य, मान्यवर नागरिक, युवक डोक्यावर फेटा बांधून सहभागी झाले होते.
सुरुवातीला येथील श्री परमेश्वर मंदिरात 2 खिल्लारी बैलजोडीचे पूजन माधवराव पाटील जवळगावकर व मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर येथून निघालेली मिरवणूक मुख्य रस्त्याने पळसपुर रोडवर असलेल्या पेट्रोल पंप समोरील मैदानावर पोहोचली. या ठिकाणी पटाच्या शर्यतीसाठी तयार असलेल्या बैलजोडीचे दर्शन घेऊन बैलगाडा शर्यतीचा प्रारंभ करण्यात आला. यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेले या स्पर्धेसाठी दूर दूर वरून बैलगाडा शर्यतीत सामील होण्यासाठी बैल जोड्या व त्यांचे मालक दाखल झाले होते. ही स्पर्धा दोन दिवस चालणार असून दिनांक 19 रोजी बैलगाडा शर्यतीचा समारोप केला जाणार आहे. दरम्यान स्पर्धास्थळी गजानन हरडपकर यांच्यातर्फे थंड शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली असून, स्पर्धेच्या ठिकाणी येणाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था संतोष वानखेडे यांनी केली आहे.
या स्पर्धेमध्ये अ गटात सहभागी झालेल्या विजेत्यां बैलगाडा मालकास प्रथम बक्षीस म्हणून 51 हजार रुपयांचे जाहीर करण्यात आले असून, आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते दिले जाणार आहे. तर दुसरे बक्षीस 31 हजार रुपये जाहीर करण्यात आला असून येथील प्रतिष्ठित व्यापारी शेख रफिक शेख मेहबूब यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. तसेच जवळपास अकरा बक्षेचे अ गटातील बैलजोडीच्या विजेत्यांसाठी ठेवण्यात आले असून ब गटातील बैलजोडींसाठी देखील आमदार जवळगावकर यांच्या हस्ते 21 हजाराचे पहिले बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच ब गटातील विजेत्यांसाठी 15 प्रकारचे बक्षीस ठेवण्यात आले असून, जवळपास तीन लाख रुपयांचे बक्षिस शंकर पटाच्या स्पर्धेसाठी ठेवण्यात आली आहेत अशी माहिती शंकर पट समितीचे अध्यक्ष संतोष गाजेवार उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे यांनी दिली आहे. यावेळी हिमायतनगर शहर व पंचक्रोशीतील अनेक मान्यवर नागरिक व्यापारी युवक पत्रकार बांधव उपस्थित होते.