नायगाव, रामप्रसाद चन्नावार। नायगाव शहरातील बेळगे नगरमधील घरासमोर उभी असलेली एम एच १२/ एन एक्स १७१३ या क्रमांकाची स्विफ्ट डिझायर कार अज्ञात चोरट्यांनी रविवारी पहाटे बनावट चाबी वापरुन चोरी केली आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून. मोटारसायकली चोरणाऱ्यांनी आपला मोर्चा कारकडे वळवल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नायगाव पोलीस ठाण्यात कुणाचा पायपोस कुणाला नसल्याने अनागोंदी कारभार सुरु असून अवैध धंद्याने डोके वर काढले आहे परिणामी शहरात व परिसरात गुन्हेगारीचे प्रमाणही फारच वाढले असून दोन महिण्यात नायगाव पोलीस ठाण्यात ५४ गुन्हे नोंद झाले आहेत. गुन्हे नोंद होण्याचे प्रमाण वाढले तरी गुन्ह्याची उकल मात्र त्या प्रमाणात होताना दिसत नाही. गुन्ह्याचा तपास करुन आरोपी निष्पन्न करण्याची एकीकडे पोलीसाची माणसिकता कमी होत असताना दुसरीकडे गुन्ह्याचा आलेखही वाढत आहे. आठवडी बाजारात तर निश्चितपणे मोबाईल चोरीला जातात.
अगोदरच्या अनेक चोरीच्या गुन्ह्याची नोंद दप्तरी तशीच असताना नवीन गुन्हे नोंद होत आहेत पण चोरटे मात्र पोलिसांना सापडत नाहीत. चोरीच्या घटनेचा तपास करण्यात पोलीसांची उदासीनता दिसून येत असल्याने चोरट्यांचे मनोधैर्य उंचावत आहे. परिणामी मोटरसायकल चोरी करणारे चोरटे आता धाडसी चोऱ्या करत असावे असे वाटते. कारण विस दिवसापूर्वी पत्रकार माधव पाटील चव्हाण यांची चोरी गेलेली मोटरसायकल अद्यापही सापडली नसतांना बेळगे नगरमधून चक्क स्विफ्ट डिझायर कार चोरीला गेल्याची खळबळ जनक घटना रविवारी सकाळी उघडकी आली.
नांदेड महामार्गावर बेळगे नगर मधील चंद्रकांत गणेश कोंडावार (पाळेकर) यांचे घर असून त्यांनी आपल्या घरासमोर एम एच १२/ एन एक्स १७१३ या क्रमांकाची स्विफ्ट डिझायर कार शनिवारी रात्री उभी केली होती. पण अज्ञात चोरट्यांनी दि.३ मार्च रोजी रविवारी पहाटे ३.३० वाजताच्या दरम्यान बनावट चावीचा वापर करुन कार चोरुन नेल्याची घटना घडली. या चोरीच्या घटनेने खळबळ उडाली असून नागरिकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कार चोरी प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास पोलीस जमादार विलास मुस्तापुरे हे करत आहेत.