इचलकरंजीत उद्यापासून १०८ कुंडीय श्री गणपती महायज्ञ

नांदेड। श्री सनातन ज्ञानपीठ प्रचार समिती आणि श्री पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळ इचलकरंजी यांच्या वतीने पंचगंगा वरदविनायक मंदीर येथे मंगळवार दि. २ जानेवारी २०२४ ते १० जानेवारी २०२४ पर्यंत १०८ कुंडीय श्री गणपती महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. जनकल्याण, सुख-शांती व मनोइच्छा पूर्ण होणेसाठी हा महायज्ञ संपन्न होत आहे. अशी माहिती पंचगंगा वरद विनायक मंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी, सनातन ज्ञानपीठ समितीचे अध्यक्ष गोविंद बजाज यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गणपती महायज्ञ तसेच इतर सर्व धार्मिक कार्यक्रम राजस्थानचे थोर संत श्री सितारामदास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे, असे सांगून श्री स्वामी आणि बजाज यांनी महायज्ञ कार्यक्रमासंबधी सविस्तर माहिती दिली. सोमवार दि. १ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ३ वाजता लक्ष्मीनारायण मंदीर झेंडा चौक येथून भव्य कलश यात्रा काढण्यात येणार आहे. तर मंगळवार दि. २ जानेवारी ते १० जानेवारी २०२४ पर्यंत या १०८ कुंडीय श्री गणपती महायज्ञाचे सकाळी ८ ते दु. ३ या वेळेत आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार दि. २ ते शनिवार दि. ६ जानेवारीपर्यंत गणपती महापुराण व गणपती महिमा दुपारी ३.३० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत या वेळेत संपन्न होणार आहे. त्याचबरोबर पंडीत अक्षय अनंत गौड यांचे रात्रौ ८ ते १० पर्यंत संगितमय नानीबाई का मायरा हा कार्यक्रम होत आहे. रविवार दि. ७ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजलेपासून पंचगंगा दिप महोत्सव साजरा होणार आहे. सोमवार दि. ८ जानेवारी रोजी सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत चुनरी मंगल महोत्सव,बुधवार दि.३ ते ९ जानेवारी या दिवशी सकाळी ७ वा. आर्ट ऑफ लिव्हींगचे विनायक मुरदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली योग व ध्यान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.त्याचबरोबर सायंकाळी ७ वाजता श्री ऋषी देवव्रत आर्ट ऑफ लिव्हींगद्वारा ज्ञान चर्चा होणार आहे.
मंगळवार दि.२ ते ९ रोजी सुरदासांचे अखंड किर्तन संपन्न होत आहे.या शिवाय सायंकाळी प्रवचन, गोमाता पूजन,गो दान नित्य कार्यक्रम होणार आहेत. दि. ६ व ७ रोजी सकाळी ११ वा.श्रीमद्भगवतगीता १८ वा अध्याय सांगण्यात येणार आहे. बुधवार दि. १० जानेवारी रोजी संत संमेलनाने व यज्ञाच्या पूर्णाहूतीने कार्यक्रम संपन्न होणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमांचा भाविक, भक्तांसह नागरिकांनी आणि गणेशोत्सव मंडळांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री. स्वामी व बजाज यांनी केले आहे.
अनेक साधू, संत, महंत, महास्वामींची उपस्थिती
या सोहळ्यासाठी श्री श्री श्री १००८ डॉ. जगदूरु चन्नसिध्दराम पंडीताराध्य शिवाचार्य, महास्वामी (श्रीशैल- आंध्रप्रदेश), जगद्गुरु श्री श्री विद्यानृसिंह भारती शंकराचार्य करवीर पीठ, कोल्हापूर, श्री वाईपीठाचे महादेव शिवाचार्य स्वामी, नूल मठाचे मठाधिपती श्री गुरु सिध्देश्वर स्वामी, संकेश्वर येथील निडसोसी मठाचे मठाधिपती प.पू. श्री शिवलिंगेश्वर महास्वामी, म्हैशाळ संस्थांचे डॉ. शिवयोगी शिवाचार्य महास्वामी, यज्ञाचार्य पंडीत चिरंजीव शास्त्री, पंडीत अक्षय अनंत गौड, संवीत कैलाशचंद्र जोशी इ. मान्यवर साधुसंत-महंत उपस्थित राहणार आहेत.
प्रशस्त पार्किंग व्यवस्था
या सोहळ्याच्या निमित्ताने शहर पंचक्रोशीसह अनेक ठिकाणहून नागरिक मोठ्या संख्येने भेट देणार. त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये यासाठी सहा एकर जागेमध्ये वाहन तळ करण्यात आले आहे. यासाठी ३०० स्वयंसेवक कार्यरत रहाणार असल्याचेही श्री स्वामी यांनी सांगितले.
