नांदेड| त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीच्या पार्श्वभूमीवर आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या १९३ व्या जयंतीचे औचित्य साधून येत्या ७ जानेवारी रोजी होणार्या सावित्री- रमाई महोत्सवात विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाची मोहर उमटविणार्या व सामाजिक बांधिलकीने कार्य करणार्या कर्तृत्ववान महिलांचा पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. महोत्सवाचे निमंत्रक तथा माजी नगरसेवक महेंद्र पिंपळे, संयोजक प्रविण कुपटीकर, स्वागताध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे यांनी पुरस्कारमुर्तींची नावे जाहीर केली आहेत.
सदर महोत्सव डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह (मुक्ता साळवेनगरी) नांदेड येथे दुपारी ३ वाजता भव्य स्वरुपात संपन्न होणार आहे. आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळीला योग्य दिशा व निश्चित ध्येयाने अंतिम ध्येय साध्य करण्यासाठी आपले सुपूत्र आंबेडकरवादी मिशन केंद्राचे प्रमुख दिपक कदम सर यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या त्याग, समर्पण व प्रचंड परिश्रमातून बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत ब्रेन आणि पेन च्या बळावर निर्माण करण्याचे स्वप्न साकारु पाहणार्या आदर्श आई सावित्री संभाजीराव कदम यांच्या अतुलनीय त्यागाबद्दल त्यांची ‘सावित्री- रमाई जीवनगौरव पुरस्कारासाठी’ निवड करण्यात आली आहे.
माता रमाई आंबेडकर विशेष सन्मान पुरस्कार नालंदा हायस्कूलच्या सचिव अनुसया हिरामण पिंपळे यांना त्यांनी केलेल्या सामाजिक, शैक्षणिक आणि धम्म चळवळीतील भरीव कार्याबद्दल जाहीर करण्यात आला आहे. माता रमाई समाजभूषण पुरस्कारासाठी शिला किशोर भवरे (मा. महापौर), प्रेमिला अशोक एडके (सामाजिक), प्रा. संध्या रंगारी, आ. बाळापूर (साहित्य), ऍड. शकुंतला वडगावकर हदगाव (विधी), अंजली कानिंदे (सामाजिक), एंगडे शांता पुरभाजी (धम्म चळवळ) यांची निवड करण्यात आली असून क्रांतीज्योती सावित्रीमाई पुरस्कारासाठी डॉ. दिपाताई चक्रवर्ती मुंबई (सामाजिक न्याय), शारदा ईबितदार (सामाजिक), सुप्रियाताई गायकवाड (स्त्री कामगार चळवळ), मथुराबाई पुठ्ठेवाड मुखेड (सामाजिक), रुचिरा बेटकर (साहित्य), प्रा. राजश्री सुरेश सावरगावकर (शैक्षणिक) यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
मानपत्र, मानचिन्ह, ग्रंथ व शाल असे पुरस्काराचे स्वरुप असून माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत, माजी आमदार अमरभाऊ राजूरकर, सुप्रसिद्ध विचारवंत सुषमाताई अंधारे, माजी जि.प. अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील अग्रगण्य असलेल्या आरसीसी चे संचालक प्रा. शिवराज आर. मोटेगावकर सर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. यावेळी ज्योती बगाटे कश्यप (जिल्हा कोषागार अधिकारी), डॉ. सविता बिरगे (शिक्षणाधिकारी प्रा. जि.प. नांदेड), बालाजी ईबितदार (ज्येष्ठ ओबीसी नेते), प्रा. डॉ. लक्ष्मण शिंदे (उपप्राचार्य, सायन्स कॉलेज, नांदेड), प्रा. मनोहर पवार (ज्येष्ठ आंबेडकरी नेते), रोहिणी मिलींद एंगडे (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या) व राहुल लोहबंदे (युवा आंबेडकरी नेते) यांची उपस्थिती राहणार आहे.यावेळी संयोजन समितीचे अध्यक्ष अंजली मुनेश्वर, कार्याध्यक्ष सत्यपाल सावंत, सचिव जी.पी. मिसाळे, बी.आर. फाऊंडेशनचे कोंडदेव हाटकर यांच्यासह संयोजन समितीच्या सदस्यांची उपस्थिती होती.
आंबेडकरवादी मिशन केंद्राचे प्रमुख दिपक कदम यांच्या मातोश्री सावित्री संभाजीराव कदम यांना ‘सावित्री- रमाई जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर केला आहे.