आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी सज्ज व्हा – सुजात आंबेडकर
![](https://newsflash360.in/wp-content/uploads/2023/12/IMG_20231223_094519.jpg)
नांदेड| राज्यभरात वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढली असून येणाऱ्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाच्या युती किंवा आघाडीची वाट न पाहता जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे असे आवाहन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू सुजात आंबेडकर यांनी केले. ते शहरातील शासकीय विश्रामगृहात आंबेडकरी बुध्दीजिवी आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना बोलत होते.
यावेळी तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे संचालक तथा अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो, नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, शिवा कांबळे, माधवदादा जमदाडे, इंजि. प्रशांत इंगोले, प्रा. डॉ. जे. टी. जाधव, उप प्राचार्य साहेबराव इंगोले, प्रा. एस. एच. हिंगोले, प्रा. विनायक लोणे, पि.आय.भगवान धबडगे, एस.एन.गोडबोले, प्राचार्य केशव जोंधळे, रामराव भुक्तरे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ बाळासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र युवा नेते सुजात आंबेडकर नांदेड दौऱ्यावर असताना त्यांनी शासकीय विश्राम गृह नांदेड येथे लोकांसोबत संवाद साधला. पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले की, गत लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आपण हारलो नसून या माध्यमातून संघटन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.
आपण अनेक ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर होतो. आज जिल्हा, तालुक्यासह राज्यातील प्रत्येक शहरातील वार्डा वार्डात बुथ कमिट्यांचे जाळे निर्माण झाले आहे. तसेच ग्रामीण भागातही मोठ्या संख्येने युवा वर्ग आणि मतदार खंबीरपणे आपल्या पाठीमागे उभा आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत विजय आपलाच होणार असून नांदेड लोकसभेची जागा आपण बहुमताने जिंकणार आहोत. त्यासाठी सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला पदाधिकारी यांनी कामाला लागावे, असेही ते म्हणाले.
नांदेडला लवकरच महामेळावा
जिल्ह्यातील बहुजन समाजाची एकजूट दाखवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा लवकरच महामेळावा नांदेडमध्ये घेतल्या जाईल, असे सुजात आंबेडकर म्हणाले. त्यासाठी सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी व्यापक स्वरूपाचे नियोजन करावे. पक्षाचे सर्वेसर्वा अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार नांदेडमध्ये आयोजित होणाऱ्या महामेळाव्यासाठी आत्तापासूनच तत्परतेने कामाला लागावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
![](https://newsflash360.in/wp-content/uploads/2023/11/Hardweyar-Nagu.jpg)