नांदेड/हिंगोली। हिंगोली लोकसभेचे खा. हेमंत पाटील यांना लंडन येथून धमकीचा फोन आला असून, त्यातून येणाऱ्या 26 जानेवारी रोजी दिल्ली येथे होणारा कार्यक्रम उधळून लावण्याची धमकी दिली आहे. यानंतर खासदार पाटील यांनी केंद्र व राज्य सरकारला पत्राद्वारे हि माहिती दिली आहे. त्यानंतर शुक्रवार पासून ता. 22 खासदार पाटील यांच्या घरासमोरील बंदोबस्त वाढविण्यात आल्याचे कार्यालयाच्या सुत्रांनी सांगितले आहे.
हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांना दि. 14 डिसेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास लंडन येथून एक निनावी कॉल आला. यामध्ये विदेशातून गुरदीपसिंह पन्नू या खलिस्तानी दहशतवाद्याने संवाद साधला. यावेळी त्याने दि. 26 जानेवारी रोजी दिल्ली येथील सोहळा उधळण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा भ्रमध्वनी खासदार पाटील यांनी घेतला नाही.
या प्रकारानंतर खासदार पाटील यांनी तातडीने राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्रालयासह राज्य सरकारला पत्र पाठविले आहे. या शिवाय त्यांनी आज दिल्ली येथे जाऊन पत्र दिल्याचे त्यांच्या कार्यालयाच्या सुत्रांनी सांगितले आहे. यामुळे खासदार पाटील यांच्या घरासमोरील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली असून एसआयडी सोबतच एसपीयूचे जवान बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या संदर्भात खासदार पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क साधता आला नाही.