
नांदेड| कृषि विभागामार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत शेतकऱ्यांचे राज्याबाहेरील अभ्यास दौरा आयोजीत करण्यात आला आहे. या अभ्यास दौऱ्याचा कालावधी 7 दिवसांचा आहे. त्यात फलोत्पादन पिकांशी निगडीत प्रशिक्षण संस्थेमध्ये तांत्रिक मार्गदर्शन वर्ग व प्रात्यक्षिके आयोजीत करण्यात येणार आहे. तसेच प्रक्षेत्र भेटी, प्रगतशील शेतकऱ्यांच्या शतावर भेटी व विपनन केंद्रे व फलोत्पादन क्षेत्रामध्ये विशेष काम करणाऱ्या खाजगी कंपन्यांना भेटी याप्रमाणे कार्यक्रम नियोजीत आहे.
जिल्ह्यातील इच्छुक फळे, फुले, भाजीपाला व मसाला पिके उत्पादक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधवा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.
27 डिसेंबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा
नांदेड जिल्ह्यात बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी याकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांच्यावतीने बुधवार 27 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या कालावधीत रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
हा मेळावा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पहिलामाळा शासकीय तंत्र प्रशाला केंद्र, आनंदनगर रोड बाबानगर नांदेड येथे होईल. या रोजगार मेळाव्यामध्ये नामंकित कंपनीकडून मुलाखत घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी 27 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.
