नांदेडमहाराष्ट्र

माळेगाव यात्रेच्या यशस्वीतेसाठी सर्व स्तरातून सहकार्याची भूमिका आवश्यक

नांदेड| आपल्या नांदेड जिल्ह्यासह शेजारील कर्नाटक, तेलंगणा राज्यातील अनेक भक्तांचा ओढा हा माळेगावकडे असतो. असंख्य लोकांचे माळेगाव येथील खंडोबा कुलदैवत असून येथील जत्रा ही मागील अनेक वर्षांपासून भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र म्हणून ओळखल्या गेले आहे. याचबरोबर येथील यात्रेत असंख्य भक्तांना करमणुकीसह वेगळा विरंगुळाही मिळतो. लहान-मोठे सर्वच यात्रेत आनंद घेतात. पूर्वापार परंपरेने ही यात्रा सुरू असून या यात्रेतील विविध उत्सवाला सकारात्मकतेने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्याची प्रशासकीय भूमिका अधिक महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले.

श्री क्षेत्र माळेगाव येथील यात्रेच्या पूर्वतयारीसाठी स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेवून नियोजनाच्या दृष्टीने आज माळेगाव येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीस खासदार सुधाकर श्रृंगारे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, उपविभागीय अधिकारी शरद मंडलीक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, माळेगावच्या सरपंच कमलाबाई रुस्तुमराव धुळगंडे, प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे, पशुवैद्यकिय विभागाचे उपायुक्त डॉ. राजकुमार पडिले, जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भुपेंद्र बोधनकर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यात्रेच्या परंपरेप्रमाणे येथील पशुप्रदर्शन, शंकरपट याकडे भाविकांचा अधिक ओढा असतो. यासाठी खासदार सुधाकर श्रृंगारे व माझी सहमती आहे. पशुधनाच्या विविध स्पर्धेसह पशुपालकांचा, प्रगतशील शेतकऱ्यांचा, यात्रेत आपले कौशल्य दाखविणाऱ्या कलावंतांची अपेक्षा ही यात्रेच्या माध्यमातून खंडेरायाच्या दरबारात योग्य तो सन्मान व्हावा एवढीच अपेक्षा असते. यासाठी जिल्हा परिषदेने विशेष खबरदारी घेऊन प्रत्येकाच्या हक्काचे सन्मान हे त्या-त्या कार्यक्रमातच दिले जावेत याची विशेष काळजी घ्यावी, असे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी स्पष्ट केले.

येथील घोड्यांचा बाजार हे या यात्रेचे वैशिष्ट्ये आहे. यात्रेकरूंना त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. कोरोनाचा एक दुसरा व्हेरिएंट आला असून त्याबाबत देशपातळीवर खबरदारी व काळजी घेतली जात आहे. अशा स्थितीत आरोग्याशी तडजोड नको. यात्रेतील भाविकांसह सर्वांना पिण्याचे पाणी हे तपासणी करूनच दिले पाहिजे. याचबरोबर बाजारात विकल्या जाणाऱ्या अन्न पदार्थांची वेळोवेळी तपासणी करून कसल्याही प्रकारची विषबाधा अथवा अनुचीत प्रकार होणार नाही याची खबरादारी घेण्याचे निर्देश खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी दिले. माळेगावसह माझ्या मतदारसंघातील असलेल्या गावांच्या विकास कामांना आजवर 50 कोटी रूपये एवढा निधी उपलब्ध करून देता आला याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.

यात्रेतील पावित्र्य, सामाजिक सलोखा, शांतता याबाबत कोणतीही तडजोड जिल्हा प्रशासनातर्फे केली जाणार नाही. यात्रेत कोणतेही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, पोलीस विभाग दक्ष आहे. याचबरोबर माळेगावच्या ग्रामस्थही अधिक दक्षता घेतील, असा विश्वास प्रशासनातर्फे व्यक्त करण्यात आला. यात्रेच्या सुरक्षेच्यादृष्टीने सुमारे 1 हजार 338 पोलीस कर्मचारी पोलीस विभागातर्फे नेमण्यात आले आहेत. यात 400 होमगार्ड आहेत. यात्रेतील महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षतेच्यादृष्टिने सीसीटीव्ही लावले जाणार आहेत. याचबरोबर अशा ठिकाणी हायमास्क लावले जाणार असून सीसीटीव्हीचे नियंत्रण हे पोलीस कक्षात ठेवण्यात आले आहे. यात्रेतील भक्ताच्या आनंद उत्सवाला सर्वाधिक प्राधान्य दिले गेले असून यात जर कोणी अडथळा अथवा गैरकृत्य केल्यास अशा संबंधीत व्यक्तींविरूद्ध तातडीने कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

10 जानेवारी ते 14 जानेवारी 2024 या पाच दिवसांच्या कालावधीत विविध महोत्सव व उपक्रमाचे आयोजन केले आहे. यात 10 जानेवारी रोजी देवस्वारी-मिरवणूक व विविध स्टॉल्सचे उद्घाटन, 11 जानेवारी रोजी कृषी प्रदर्शन, विविध स्पर्धा, पशु प्रदर्शन, 12 जानेवारी रोजी कुस्त्यांची दंगल, 13 जानेवारी रोजी लावणी व कलामहोत्सव, 14 जानेवारी कला महोत्सव व समारोप असे प्राथमिक नियोजन असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्यावतीने देण्यात आली.

पशुपक्षी बाजार व खरेदी विक्री
सदर यात्रा ही जवळपास एक महिनाभर चालते. यात इथला जनावराचा बाजार हा सर्वदूर ओळखला जातो. यात घोडे, उंट, गाय, बैल, म्हैस, रेडे, गाढव, शेळया, मेंढया, कुत्रे आदी पशु पक्षी इतर राज्यातूनही लोक घेवून येतात. शासनाचा वन्य पशुपक्षांचा कायदा अंमलात आणल्यापासून कायद्याप्रमाणेच आता हा बाजार भरतो. कायद्यातील तरतुदीप्रमाणे या यात्रेतील इतर सर्व उपक्रम यशस्वी घेण्यासाठी योग्य ते नियोजन केले जाईल असे जिल्हा परिषदेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!