नांदेड। दक्षिण भारतात प्रसिध्द असलेल्या माळेगांव यात्रेला जोडणार्या रस्त्यांचा समावेश करुन निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी नांदेडचे खा.चिखलीकर यांनी केंद्रीय सडक निर्माण मंत्री ना.नितीन गडकरी यांच्याकडे पत्र देवून केली.
नांदेड जिल्ह्यातील खंडोबा मंदिर हे प्रसिध्द तीर्थस्थान आहे. दरवर्षी माळेगांव येथे मोठी जत्रा भरते. दक्षिण भारतात प्रसिध्द असलेल्या माळेगांव यात्रेला जोडणार्या रस्त्यांचा समावेश केंद्रीय सडक निर्माण योजनेत समावेश करुन रस्त्यांसाठी निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी खा.चिखलीकर यांनी ना. नितीन गडकरी यांची भेट घेवून केली आहे.
खा.चिखलीकरांनी ना.गडकरी यांना दिलेल्या पत्रात म्हटले की, माळेगांव येथे खंडोबाची मोठी यात्रा भरते. या यात्रेला दक्षिण भारतातून लाखोंच्या संख्येने भाविक भक्त येतात. प्रसिध्द तीर्थस्थान असलेले नामदेव मठ संस्थान हे स्थानही माळेगांवला जोडणार्या रस्त्यावर आहे. माळेगांव यात्रेला जोडणारे रस्ते माळाकोळी, वागदवाडी, चोंडी प्रजिमा-59 दगड सांगवी, उमरज रामा-56, तळ्याची वाडी ते प्रजिमा-69 कि.मी., 91/050 ते 16/420 प्रजिमा 133 हे रस्ते जोडले जातात.
माळेगांव यात्रेला आंध्र प्रदेश, तेलंगना, कर्नाटक राज्यातून भाविक मोठ्या प्रमाणात येतात. या रस्त्यांची दुरावस्था निर्माण झाली असल्यामुळे भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. या तीर्थस्थानांना जोडणार्या रस्त्यांना मंजूरी देवून केंद्रीय रस्ते विकासअंतर्गत रस्त्यांचा विकास करण्यासाठी निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी खा.चिखलीकर यांनी केली आहे. यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य बाळू खोमणे, माजी जिल्हा परिषद सदस्य विनायकराव पाटील मांजरमकर, युवा मोर्चाचे मधुकर माने यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.