कंधार/नांदेड| कंधार कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते नारायण गायकवाड यांनी पेठवडज येथील नागरिकांच्या आरोग्याच्या व इतर समस्या तात्काळ सोडवाव्यात या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आमरण उपोषणाला सुरुवात केली होती.
सुरुवातीला जिल्हा परिषद प्रशासनाने या आंदोलनाकडे सवयीप्रमाणे कटाक्षाने दुर्लक्ष केले. दोन दिवस कडकडीत थंडीत नारायण गायकवाड यांनी आमरण उपोषण केले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी सकाळी सुट्टीच्या दिवशी प्रशासनाने या आंदोलनाची थोडीफार दखल घेतली आणि जिल्हा परिषदेचे अधिकारी नारायण गायकवाड यांच्या उपोषण स्थळी दाखल झाले. चर्चेअंती नारायण गायकवाड यांनी केलेल्या मागण्या संदर्भात आगामी सहा महिन्याच्या आत जिल्हा परिषद प्रशासन पेठवडज गावाला आरोग्यासह इतर सुविधा उपलब्ध करून देईल असे तोंडी आश्वासन देण्यात आले.
पेठवडज येथे असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याची व कर्मचारी निवाऱ्याची इमारत ही अतिशय जीर्ण झाली असून ती तात्काळ दुरुस्त करण्यात यावी. पेठवडज हे गाव जुनी बाजारपेठ असून या गावालगत दहा ते पंधरा छोटी छोटी गावे आहेत. या गावातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी पेठवडज येथे येत असतात, मात्र विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी असलेली शाळेची इमारत ही निजामकालीन बांधकामाची अतिशय पडझड झालेल्या अवस्थेत होती.
नारायण गायकवाड यांच्या अथक परिश्रमाने या शाळेच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध झाला. गावातील नागरिकांनीही आपल्या पाल्यांच्या भविष्यासाठी या बांधकामासाठी दहा टक्के निधी लोकसहभागातून उपलब्ध करून दिला, मात्र सदरील शाळा बांधकामाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे लक्षात आल्यानंतर गावकऱ्यांनी या बांधकामाला विरोध केला. या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी नारायण गायकवाड यांनी केली आहे. पेठवडज येथे जुने प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या इमारतीची व कर्मचारी निवारा इमारतीची परिस्थिती अतिशय बिकट आहे. पावसाळ्यात या इमारतीत पाण्याची डोह साचत असतात. या इमारतीचे बांधकाम व्हावे, पेठवडज व परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न सुटावेत.
अशी मागणीही उपोषणादरम्यान नारायण गायकवाड यांनी केली होती. पेठवडज ही परिसरातील मोठी बाजारपेठ म्हणून लोकसंख्येने मोठे असलेले गाव आहे. परंतु या गावात अनेक नागरी समस्या मागील अनेक वर्षापासून कायम आहेत. सामाजिक कार्यकर्ते नारायण गायकवाड ह्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठपुरावा करत असतात. वरील मागण्या संदर्भाने मागील वर्षभरापासून नारायण गायकवाड हे जिल्हा परिषदेचे उंबरठा झिजवत आहेत, परंतु जिल्हा परिषद प्रशासन या मागण्या संदर्भाने उदासीन असल्याने नारायण गायकवाड यांना उपोषणाचा मार्ग निवडावा लागला. त्यांनी गुरुवारपासून जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आमरण उपोषणास सुरुवात केली होती.
माळेगाव यात्रेच्या तयारीच्या व बैठकांच्या धामधुमीत दोन दिवस या आंदोलनाकडे सवयीप्रमाणे दुर्लक्ष करणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाने तिसऱ्या दिवशी या आंदोलनाची दाखल घेतली. वरील सर्व मागण्या संदर्भाने आगामी सहा महिन्यात निर्णय देऊ अशी भूमिका घेऊन जिल्हा परिषदेचे अधिकारी गायकवाड यांच्याकडे आले. प्रशासनाला संधी द्यावी म्हणून नारायण गायकवाड यांनी शनिवारी आमरण उपोषण आंदोलनाला तूर्तास स्थगिती दिली आहे. गावच्या समस्या सुटल्या नाही तर आपण मंत्रालयात जाऊन उग्र आंदोलन करू असा इशारा यावेळी माध्यमांशी बोलताना गायकवाड यांनी दिला आहे.