नांदेड| नांदेड जिल्हा परिषद गट-क सरळसेवा पदभरती परीक्षा-2023 च्या परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केले आहेत.
या आदेशात नमूद केलेल्या इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विष्णुपुरी नांदेड, होरिझोन इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल लातूर रोड नांदेड, आरजीसी हायटेक डिजीटल झोन नांदेड द्वारा राजीव गांधी कॉलेज कॅम्पस विद्युत नगर नांदेड, श्री संभाजी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नालॉजी नांदेड शामल एज्युकेशन कॅम्पस देगाव रोड समोर नांदला दिग्रस खडकूत या 4 परीक्षा केंद्रापासून 100 मीटरच्या परिसरात दि. 18 ते 26 डिसेंबर 2023 ( दि. 22 व 25 डिसेंबर 2023 वगळून) कालावधीत तीन सत्रात ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे.
सकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंतच्या वेळेत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी या व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच या दर्शविलेल्या वेळात परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स / एस.टी.डी./ आय.एस.डी/ भ्रमणध्वनी/पेजर/ फॅक्स/झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास या आदेशाद्वारे प्रतिबंध करण्यात आले आहे.
मिनी ट्रॅक्टर उपसाधने पुरवठा योजनेला 29 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ
नांदेड – अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याबाबतची योजना शासनाने सुरु केली असून शासन निर्णयान्वये योजनेच्या अटी व शर्ती निश्चित केलेल्या आहेत. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करणे या योजनेचे प्रस्ताव सादर करण्यासाठी शुक्रवार 29 डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत इच्छूक लाभार्थ्यांचे प्रस्ताव विहित नमुन्यात व शासन निर्णयातील अटी, शर्तींची पूर्तता करुन घेऊन पात्र बचतगटांना या योजनेचा लाभ देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यास 30 नोव्हेंबर 2023 ही शेवटची तारीख दिली गेली होती. परंतु विविध संघटनांनी दिलेली तारीख पुन्हा वाढवून मिळण्याबाबत विनंती केल्याने शुक्रवार 29 डिसेंबर 2023 पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे, असे समाज कल्याण सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
समस्याग्रस्त व पीडित महिलांसाठी 18 डिसेंबर रोजी महिला लोकशाही दिन
नांदेड – समस्याग्रस्त व पिडीत महिलांसाठी सोमवार 18 डिसेंबर 2023 रोजी महिला लोकशाही दिन आयोजित केला आहे. या लोकशाही दिनात समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे. दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. सोमवार 18 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली महसूल प्रबोधनी प्रशिक्षण केंद्र, एसबीआय एटीएमच्या मागे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमूद संबंधित विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.