मारतळा येथील जरांगे पाटील यांची सभा लक्षवेधी ठरणार – शंभर एकरचे मैदान सज्ज; २४ गावांचा सहभाग
मारतळा/नांदेड| मराठा समाजाच्या आरक्षणासाठी महाराष्ट्रभर जन आंदोलन उभे करणारे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा येत्या आठ डिसेंबर रोजी मारतळा येथे होणार आहे. ही सभा संपूर्ण मराठवाड्यात लक्षवेधी ठरणार आहे. यासाठी २४ गावातील मराठा बांधव तन मन धनाने जय्यत तयारीला लागले असून जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी शंभर एकरचे भव्य मैदान सज्ज झाले आहे.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील राज्यात विविध ठिकाणी सभा घेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांची मारतळा येथे विशेष सभा होणार आहे. यासाठी मराठा बांधवांच्या पुढाकारातून १00 एकरचे मैदान सुसज्ज करण्यात आले आहे. येणाऱ्या समाज बांधवांची गैरसोय होऊ नये म्हणून सुमारे पंधराशे स्वयंसेवक स्वयंस्फुर्तिने तयार झाले असून त्यात शंभर महिलांचा समावेश आहे . येणाऱ्या समाज बांधवांना वैद्यकीय गरज भासल्यास दहा वैद्यकीय पथके, १० रुग्णवाहिका , महिला व पुरुषांसाठी वीस शौचालये, त्याशिवाय जागोजागी पिण्याचे पाणी, भोजन व्यवस्था व वेगवेगळ्या पाच ठिकाणी वाहनतळ उभारण्यात आले आहेत. जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. सभेसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले असून या व्यासपीठावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्या सोबत फक्त मनोज जरांगे पाटील यांची उपस्थिती राहणार आहे. सर्वांना नीट ऐकता यावे पहाता यावे यासाठी जागोजागी एलईडी स्क्रीन उभारण्यात आले आहेत. यावेळी पुष्पवृष्टी करून व वारकरी दिंडी सह पारंपरिक पद्धतीने जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात येणार आहे.
लक्षवेधी साखळी उपोषण : जरांगे पाटील यांच्या आवाहनानुसार मारतळा येथे मागील २८ ऑक्टोबर पासून साखळी उपोषण सुरू आहे. यादरम्यान २४ गावातील मराठा बांधवांनी साखळी उपोषणात तनमन धनाने सहभाग नोंदवला. या ठिकाणी दररोज किर्तन, भजन, शाहिरी आदी समाज प्रबोधनाचे कार्यक्रम घेण्यात येत आहेत. उमरा सर्कलमधील प्रत्येक गावातून समाज बांधव आपापली जबाबदारी स्वीकारून उपोषणात सहभागी होत आहेत. याची दखल घेऊनच जरांगे पाटील यांनी सभेसाठी विशेष वेळ दिल्याची माहिती सकल मराठा समाज मारतळा ,उमरा सर्कलच्या वतीने देण्यात आली. जरांगे पाटील यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू असेही सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले.