महाराष्ट्र

मुंबईकरांनी अनुभवली मुख्यमंत्र्यांची ‘स्वच्छता मॅरेथॉन’ स्वच्छ, सुंदर, प्रदुषणमुक्त मुंबईसाठी मुख्यमंत्री उतरले रस्त्यावर

मुंबई| मुंबई स्वच्छ, सुंदर, प्रदुषणमुक्त करण्याच्या ध्यास घेतलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी साडेसहाला सुरू केलेला स्वच्छतेचा जागर दुपारी बारापर्यंत सुरू होता. मुंबईतील विविध ठिकाणांना भेटी देत त्यांनी डीप क्लिन मोहिमेचा शुभारंभ केला. सायन, धारावी, कमला नेहरू पार्क, बाणगंगा, बीआयटी चाळ परीसर या भागांना भेटी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली स्वच्छतेची मॅरेथॉन जवळपास सहा तास सुरू होती. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी अंतर्गत रस्ते, गटारी, नाले सफाई, रस्त्यांची सफाई कामांची पाहणी केली जागोजागी सफाई कामगारांनी त्यांनी संवाद साधला. सफाई कामगार मुंबईचे खरे हिरो आहेत असे गौरवोद्गारही मुख्यमंत्र्यांनी काढले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या संकल्पनेतून मुंबईत डीप क्लिन (सखोल स्वच्छता) मोहिमेचा आज शुभारंभ झाला. धारावी टी जंक्शन येथून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. शालेय विद्यार्थी, सफाई कामगार यांच्याशी संवाद साधत मुंबईची स्वच्छता मोहिम ही लोकचळवळ झाली पाहिजे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. नालेसफाई, रस्ते धुणे याकामांच्या पाहणीसाठी मुख्यमंत्र्यांनी बऱ्याच ठिकाणी पायपीट केली.

मुंबईत असलेल्या 24 वॉर्डमध्ये सखोल स्वच्छता मोहिम राबविली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. एकाच वेळी एका वॉर्डमध्ये अन्य चार ते पाच वॉर्डातील सफाई कर्मचारी बोलावून सुमारे तीन ते चार हजार सफाई कामगारांच्या माध्यमातून रस्ते, गटारी, पदपथ, नालेसफाई या मोहिमेंतर्गत करण्यात येत आहे. या मोहिमेमुळे सफाई कामगारांचे जथ्थे आज मुंबईच्या एफ उत्तर, जी उत्तर, डी वार्ड मध्ये दिसत होते. प्रत्येकाच्या हातात झाडू आणि जोडीला रस्ते धुणारी यंत्रे, फॉगर, स्मोक गन या अत्याधुनिक साहित्याच्या मदतीने स्वच्छतेचा जागर सुरू होता.

प्रदुषणमुक्तीवर उपाय योजना म्हणून मुंबईचे रस्ते धुताना आधी त्यावरील माती उचलून मग उच्च दाबाने पाणी मारून रस्ते धुवावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. आज पासून सुरू झालेल्या सखोल स्वच्छता मोहिमेचा परिणाम येत्या काही दिवसात नक्कीच बघायला मिळेल. सफाई कर्मचारी सकाळी लवकर कामाला सुरूवात करतात. मुंबईकरांच्या निरोगी आयुष्याची जबाबदारी त्यांच्यावर असून मुंबईचे खरे हिरो ते आहेत असे सांगत त्यांनी ठरवले तर मुंबई, स्वच्छ, निरोगी आणि प्रदुषणमुक्त व्हायला वेळ लागणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सार्वजनिक स्वच्छता गृहे, शौचालयांची दिवसातून पाच वेळा स्वच्छता करा
धारावी भागात मोहिमेला सुरूवात झाल्यानंतर या भागातील सार्वजनिक स्वच्छता गृह, शौचालये यांची दिवसातून पाच वेळा स्वच्छता करण्यात यावी असे निर्दोश मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिले. केवळ मुख्य रस्त्यांच्या स्वच्छतेवर भर न देता झोपडपट्टीतील अंतर्गत रस्ते, पदपथ यांची देखील साफसफाई करा. संपूण मुंबईत सखोल स्वच्छता मोहिम यशस्वी राबविली तर आमुलाग्र बदल दिसून येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सफाई कामगारांच्या 48 वसाहतींचा कायापालट
मुंबईतील सफाई कामगारांच्या 48 वसाहतींचा कायापालट करण्यात येणार असून गौतम नगर, कासरवाडी येथील वसाहतींना भेटी दिल्या आहेत. यासर्व वसाहतींमध्ये दर्जेदार सोयीसुविधा देण्यात येतील.. स्वच्छतेच्या बाबतीत मुंबईचे नाव देशात नव्हे तर जगात अग्रक्रमावर येवू द्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी सफाई कर्मचाऱ्यांना केले. सायन हॉस्पीटल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्र्यांनी स्वच्छता मोहिमेला सुरूवात केली. धारावी, शाहू नगर, एकेजी नगर, धारावी, टी जंक्शन, कमला नेहरू पार्क, बाणगंगा तलाव, गिरगाव चौपाटी येथील स्वच्छतेची पाहणी केली. जागोजागी मुख्यमंत्री सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद साधत होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना स्वच्छतेच्या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन करीत होते.

गिरगाव चौपाटीवर मुख्यमंत्री रंगले क्रिकेटमध्ये
गिरगाव चौपाटीवर पाहणीसाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी क्रिकेट खेळण्यासाठी आलेल्या बच्चे कंपनीने छायाचित्र काढण्याची विनंती केली. त्यांनी छायाचित्र घेतल्यानंतर मुलांनी मुख्यमंत्र्यांच्या हातात बॅट दिली आणि आमच्या सोबत खेळा अशी विनंती केली. त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मुलां सोबत काही क्षण क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला.

यावेळी मुंबई शहराचे पालकमंत्री दिपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) उप आयुक्त (परिमंडळ 1) डॉ. संगीता हंसनाळे, उप आयुक्त (परिमंडळ 2) रमाकांत बिरादार , जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे, डी विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे आदी उपस्थित होते.

लहान मुलांचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुठे क्रिकेट खेळण्याचा तर कुठे फोटोचा आग्रह

मुंबई महापालिकेच्या संपूर्ण स्वच्छता (डीप क्लिनिंग) मोहिमेच्या शुभारंभानिमित्त आज सकाळपासून मुंबईच्या विविध भागात भेटी देणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील लोकप्रतिनिधी म्हणून असलेली कामाची तडफ मुंबईकरांना दिसली. दुसऱ्या बाजूला या मोहिमेत सहभागी झालेल्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये, लहान मुलांमध्ये मुख्यमंत्र्यांना भेटण्याची, त्यांच्यांशी बोलण्याची उत्सुकता दिसली.

सुरुवातीला कमला नेहरू उद्यान येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहचले असता त्यांनी सर्वप्रथम रस्त्याच्या पलीकडे उभ्या असणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी संवाद साधत असतांना त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. मग मुख्यमंत्र्यांनीही त्यांची इच्छा पूर्ण करत फोटो काढले. नंतर कमला नेहरू उद्यानाच्या प्रवेशद्वारावर उभ्या असलेल्या विविध विद्यालयाच्या आणि स्काऊट -गाईडच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना हाक मारली. त्यांनीही मुलांच्या हाकेला प्रतिसाद देत त्यांच्या जवळ जाऊन विचारपूस करत मुलांच्या आग्रहास्तव फोटो पण काढले. हाच प्रकार गिरगांव चौपाटी आणि बी.आय.टी. चाळ येथे ही घडला. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सर्व ठिकाणी विद्यार्थ्यांचा हट्ट पुरवत त्यांच्यासोबत फोटो काढून घेतले.

गिरगांव चौपाटीवर लुटला क्रिकेटचा आनंद
गिरगाव चौपाटी येथे पाहणीसाठी गेले असता तेथे क्रिकेट खेळणारी मुले मुख्यमंत्र्यांचा ताफा पाहून पुढे आली. तेव्हा वाहनातून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उतरलेले पाहून मुलांना आश्चर्याचा धक्का बसला. या मुलांना जवळ बोलवून त्यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी फोटो काढलेच. याचवेळी या मुलांनी मुख्यमंत्र्यांना क्रिकेट खेळण्याचा आग्रह ही केला. मग मुख्यमंत्र्यांनी देखील या मुलांचे मन राखून हाती बॅट घेत फटकेबाजी केली. थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्या सोबत क्रिकेट खेळतांना मुलांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता. आपल्या विकासाभिमुख कामांमुळे जनतेत लोकप्रिय झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लहान मुलांचेही तितकेच लाडके असल्याचे आजच्या मुंबई संपूर्ण स्वच्छता मोहिमेच्या दौर्‍यात दिसून आले.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!