रविवार पासून दर्शनशास्त्रांवर व्याख्यानमाला आणि ज्ञानेश्वरी मुक्तचिंतन
नांदेड| ज्ञानेश्वर अभ्यास मंडळ नांदेड यांनी श्री संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त 3 ते 11 डिसेंबर पर्यंत दर्शनशास्त्र आणि ज्ञानेश्वरी यांच्यावर व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. या विषयांवर नांदेड जिल्ह्यात प्रथमच होत असलेली व्याख्यानमाला नवा मोंढा येथील हनुमान मंदिरात सायंकाळी चार ते सहा या वेळात आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी दिली.
सदरील नऊ दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये सकाळी सात ते आठ मध्ये ओंकारेश्वरी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वैदिक हवन होईल आणि त्यानंतर सकाळी आठ ते दहा या वेळेत श्री ज्ञानेश्वरीचे सामूहिक पारायण होणार आहे. त्यानंतर दररोज सायंकाळी चार ते सहा या वेळामध्ये विविध विषयांवर मान्यवरांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये तीन नास्तिक दर्शने आणि सहा अस्तितक दर्शने यांचा समावेश करण्यात आला आहे.
3 डिसेंबर रोजी वैशेषिक दर्शन व चार्वाक दर्शन, 4 रोजी उत्तरमीमांसा, 5 रोजी सांख्यदर्शन व पूर्वमीमांसा, 6 रोजी योगदर्शन, 7 तारखेला जैनदर्शन आणि 8 तारखेला न्यायदर्शन आणि बौद्धदर्शन यावर व्याख्याने होतील. यासोबतच ज्ञानेश्वरीचे श्रवण कसे करावे, चांगदेव पासष्टी, धर्म आणि त्याची लक्षणे, ज्ञानेश्वरीतील शिवदर्शन, ज्ञानेश्वरी व वेद या विषयावरील व्याख्यानासहितच ज्ञानेश्वरांची अभंगवाणी याही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 11 डिसेंबर रोजी श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे साखळी पारायण होईल आणि त्यानंतर कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन एकनाथराव मामडे,प्रवीण कासलीवाल आणि मधुकरराव देशमुख यांनी केले आहे.