हदगाव/हिमायतनगर। किसान सन्मान निधी व इतर कृषी अनुदान योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा करून घेऊ नये, असा शासन निर्णय असतांना सुद्धा एसबीआय बँक शाखेत किसान सन्मान निधी व इतर कृषी अनुदान योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यानंतर बँकेकडून त्या खात्याला होल्ड करण्यात आले आहे. लावण्यात आलेलं होल्ड तात्काळ हटवून किसान सन्मान अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यातून कपात करू नका अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात किसान सन्माननिधी योजनेची रक्कम नुकतीच वर्ग करण्यात आली आहे; परंतु स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत बँकेकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्याला होल्ड लावण्यात आल्यामुळे सध्या आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी व इतर कृषी अनुदानापोटी प्रशासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेली रक्कम उचलता येत नाही.
सध्या दिवाळीची धामधूम सुरू आहे, अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात कृषी अनुदानापोटी जमा असलेली रक्कम त्वरित वाटप करावी. अशी मागणी एका निवेदनाद्वारे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रिय अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.
याबाबत पीडित शेतकऱ्यांनी बँकेच्या शाखा व्यवस्थापकाकडे विचारणा केली असता आपल्याकडे शेतीविषयक कर्ज आहे. त्यामुळे ही रक्कम आपण उचलू शकत नाही, असे सांगण्यात येत असल्याच्या तक्रारी पीडित शेतकऱ्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांची भेट घेऊन केल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हाप्रमुख कोहळीकर यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रिय अधिकारी यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या बँक खात्यात किसान सन्मान निधी, पीकविमा व इतर कृषी अनुदान योजनेची जमा झालेली रक्कम होल्ड व कर्जापोटी कपात न करता त्वरित वाटप करण्यासाठी आपल्या स्तरावरून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व शाखांना निर्देशित करावे. आणि अडचणीत असलेल्या शेतकरी वर्गाला दिलासा द्यावा. अशी विनंती जिल्हाप्रमुख कोहळीकर यांनी केली आहे.