हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील 24 हजार 972 लाभार्थ्यांना आंनदाचा शिधा मिळणार – तहसीलदार गायकवाड
हिमायतनगर, अनिल मादसवार| राज्य सरकारच्या वतीने गोरगरिबांचा दिवाळी सण गोड व्हावा, या उद्देशाने सर्वसामान्य स्वस्त धान्य लाभधारकांना केवळ १००/ रुपयात आनंदाचा शिधा देण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार यावेळी आनंदाचा शिधामध्ये २ वस्तूची वाढ करण्यात आली असून, आनंदाचा शिधा किट हिमायतनगरच्या गोदामात येऊन पोचल्या आहेत. लवकरच 24 हजार 972 लाभार्थ्यांना आंनदाचा शिधा वाटप केला जाईल अशी माहिती हिमायतनगरचे तहसीलदार श्री डी.एन.गायकवाड यांनी न्यूजफ्लॅश३६०डॉटइनशी बोलताना दिली आहे.
राज्य सरकारतर्फे दिवाळी, गुढीपाडवा व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून, आनंदाचा शिधा केवळ १००/ रुपयांमध्ये वितरित करण्यात आला होता. दिवाळी सण हा सर्वंतर मोठ्या उत्सहात साजरा केला जातो, त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राज्य सरकारच्या वतीने शिधापत्रिका धारकांना १००/ रुपयात ६ वस्तूंचा आनंदाची शिधा संच वितरित करण्यात येणार आहे. दिवाळी सण उत्सवानिमित्त देण्यात येणारा आनंदाचा शिधा आपल्या तहसील कार्यालयामध्ये उपलब्ध आहे का ? अशी विचारणा पुरवठा अधिकारी शेवाळे, गोदामपाल बुडकेवाड यांना विचारणा केली असता, तहसील कार्यालयाच्या वतीने शिधा वाटप होणार असल्याचे सांगितले.
दिवाळी सण उत्सवानिमित्त सर्वसामान्य स्वस्त धान्य लाभधारकांना केवळ १००/ रुपयात १ किलो साखर, अर्धा किलो चणाडाळ, अर्धा किलो रवा, १ लिटर पाम तेल, मैदा अर्धा किलो, पोहा अर्धा किलो अशा ६ वस्तुची किट शासनाने मंजूर केली आहे. त्यामुळे गोरगरिबांचा दिवाळी सण हा गोड होणार असून, हिमायतनगर तालुक्यातील 24 हजार 972 लाभार्थ्यांना आंनदाचा शिधा वाटप केला जाणार असल्याने शिधापत्रिका धारकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.