नांदेड| दीपावलीनिमित्त शाळांना ५ नोव्हेंबर पासून सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. या कालावधीतही अध्ययन सुरू राहावे यासाठी जवळा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी अनोखी शक्कल लढवित ‘खाऊ’ उपक्रम सुरू केला आहे या अतंर्गत विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, सहशिक्षक संतोष घटकार, विषय शिक्षक संतोष अंबुलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाध्यायपुस्तिका आणि बौद्धिक फराळाचे वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच प्रतिनिधी साहेबराव शिखरे, माजी सरपंच कैलास गोडबोले, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशनराव गच्चे, माता पालक संघाच्या अध्यक्षा मनीषा गच्चे, अंगणवाडी कर्मचारी इंदिरा पांचाळ शिक्षक मित्र कविता गोडबोले हैदर शेख, पांडूरंग गच्चे यांची उपस्थिती होती. विद्यार्थी हा स्वतःच ज्ञानाचा रचियता असतो. परंतु मोबाईलमुळे पुस्तके वाचनाची आवड लोप पावत चालली आहे. शिक्षकांनी ह्या ज्ञानरचनावादाचा पुरस्कार करीत हे तत्व प्रत्यक्षात उतरविले आहे.
दीपावलीनिमित्त मिळालेल्या सुट्ट्यांचा सदुपयोग करीत शाळेतील विद्यार्थ्यांना दररोज वाचनाची सवय असावी यासाठी शालेय वाचनालयातील विविध पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. तसेच शालेय अभ्यासक्रमावर आधारित स्वाध्याय पुस्तिकाही वाटप करण्यात आल्या आहेत. घरी राहून दररोज दोन तास या उपक्रमासाठी देण्यात येणार आहे. यातून भाषा, गणित, इंग्रजी, परिसर अभ्यासाची उजळणी व्हावी आणि अवांतर वाचनातून नवज्ञानाची निर्मिती व्हावी हा असा या ‘खाऊ’ उपक्रमाचा उद्देश आहे. हा उपक्रम २७ नोव्हेंबर चालू राहील असे मुख्याध्यापक गंगाधर ढवळे यांनी सांगितले.