नांदेड,अनिल मादसवार| माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर आता काँग्रेसला हादरे बसण्यास सुरुवात झाली आहे. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात नांदेड-वाघाळा महानगर पालिकेच्या 55 निर्वाचित व स्विकृत नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला आहे. स्वतः चव्हाण यांनीच शनिवारी दुपारी समाजमाध्यमांवर फोटो आणि प्रतिक्रिया पोस्ट करून नांदेडच्या राजकारणातली ही मोठी बातमी समोर आणली. भविष्यातही जिल्ह्यातील काही आमदार व स्थानिक बडे नेते भाजपमध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये एकच खळबळ माजली आहे.
अशोक चव्हाण यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसला जबर धक्का बसला. आता त्यांचे समर्थक अनेक आमदारही भाजपमध्ये जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. नांदेड जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चव्हाण यांच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले होते. नांदेड मनपातील अनेक नगरसेवकांनी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन शनिवारी भाजपत प्रवेश केला आहे. यामुळे स्थानिक काँग्रेससह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. विधानपरिषदेचे माजी गटनेते अमरनाथ राजूरकर यांनी याविषयी विस्तृत माहिती देताना सांगितले की, अशोकराव चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर नांदेड-वाघाळा महानगर पालिकेच्या 52 माजी नगरसेवकांनी त्यांच्याशी संपर्क साधून पाठिंबा दिला होता. चव्हाण यांचे नांदेडला आगमन झाल्यानंतर कालपासून अनेक नगरसेवकांनी निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. काही नगरसेवकांनी आज झालेल्या एका बैठकीत भाजपला समर्थन देत असल्याचे जाहीर केले. चव्हाण यांच्या उपस्थितीतच या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खा. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आतापर्यंत निवडून आलेले व स्विकृत मिळून एकूण 55 नगरसेवक भाजपमध्ये सामिल झाले आहेत. नांदेड-वाघाळा महानगर पालिकेच्या मागील निवडणुकीत अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे 81 पैकी 73 नगरसेवक निवडून आले होते. पुढील काळात त्यातील आणखी काही नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करतील, असेही सूतोवाच अमरनाथ राजूरकर यांनी केले आहे.
दरम्यान, अशोकराव चव्हाण यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांचे स्वागत व अभिनंदन केले. नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या मागील कार्यकाळातील नगरसेवकांशी आज विस्तृत चर्चा झाली. सुमारे 55 हून अधिक माजी निर्वाचित नगरसेवक आणि स्वीकृत सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा निर्णय घेतला, असे चव्हाण यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
नांदेड हा अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गत लोकसभा निवडणुकीत त्यांना नांदेडमधून पराभवाचा सामना करावा लागला होता. पण आजही जिल्ह्यात त्यांचा चांगला जनसंपर्क असून कार्यकर्त्यांचे मोठे नेटवर्क आहे. त्यामुळे माजी नगरसेवकांनंतर आता त्यांचे समर्थक आमदार व अन्य पदाधिकारीही आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधून बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश करू करण्याची चिन्हे आहेत. याविषयी येत्या काही दिवसांत नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे अशोक चव्हाण यांनी आपल्या कन्या श्रीजया यांच्या उमेदवारीसाठी भाजपत प्रवेश केल्याचा दावा केला जात आहे. चव्हाण यांनी श्रीजया यांच्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीचा आग्रह धरला होता. पण याविषयी पक्षश्रेष्ठींकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे अशोक चव्हाण यांनी वेगळी वाट निवडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.