करियरनांदेड

युवकांनो शिक्षणासह स्वयंरोजगाराकडे वळा – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

नांदेड| सेवा क्षेत्राशी निगडीत मोठ्याप्रमाणात रोजगारांच्या संधी उपलब्ध आहेत. या संधीला साध्यात रूपांतर करण्यासाठी प्रत्येक युवकांनी पुढे आले पाहिजे. यात नाविन्यता शोधली पाहिजे. आपल्या ज्या कल्पना आहेत त्याला तंत्रकुशलतेची जोडही दिली पाहिजे. केवळ अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या व्यक्तींनाच नाविन्याचा शोध घेता येऊ शकतो हे मनातून काढून टाकत इतर अभ्यासक्रमाच्या युवकांनी स्वयंरोजगारासाठी पुढे वळा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज जिल्हास्तरीय सादरीकरण सत्राच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठातील सामाजिक शास्त्र संकुल येथे आयोजित या कार्यक्रमास संचालक डॉ. घनश्याम येळणे, सहायक संचालक रेणुका तम्मलवार, इनोवेशन इनक्यूबेशन सेंटरचे संचालक डॉ. एस. जे. वाडेर, सीईओ डॉ. कौस्तुभ दास, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार उपस्थित होते.

कोणतीही नाविन्यपूर्ण कल्पना ही सुरूवातीला वेडेपणाच्या संशयात अडकलेली असते. लाईटच्या बल्पाचा शोध लावतांना एडीसन यांना समाजाने सुरूवातील वेड्यातच काढले होते. पौराणिक कथामध्ये आरशात पाहून स्वत:शी संवाद साधण्याचे दाखले आजच्या काळात प्रत्यक्ष व्हिडिओ कॉलिंगपर्यंत प्रत्ययास आले आहेत. कोणतीही कल्पना प्रत्यक्ष साकारेपर्यंत आपली जिद्द युवकांनी सोडली नाही पाहिजे. आपण जे काही करू त्यात सहजता व गुणवत्ता येण्यासाठी प्रयत्नशील रहा. तुमच्या मदतीसाठी विद्यापिठात इनक्यूबेशन सेंटर, कौशल्य विकास विभाग, अभियांत्रिकी महाविद्यालय, आयटीआय सारखी केंद्र तुमच्या मदतीसाठी तत्पर आहेत. तुम्ही विश्वासाने पुढे आल्यास या भागातील युवकही औद्योगिक विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतील असा विश्वास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केला.

युवकांच्या प्रगतीसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. छोट्यातल्या छोट्या जागेपासून, भांडवलापासून आपल्याला काय करता येईल याचा प्रयत्न युवकांनी केला पाहिजे. आज निरमा, बिस्लरी सारखे मोठे झालेले ब्रँड कधीकाळी अतिशय छोट्या जागेतून सुरू झालेले होते. नंतर त्यांचा विस्तार वाढला. छोट्यातल्या छोट्या गोष्टींपासून जे काही सुरू करता येईल ते सुरू करण्यावर युवकांनी भर द्यावा, असे डॉ. घनश्याम येळणे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, इनोवेशन इनक्यूबेशन सेंटरचे संचालक डॉ. एस. जे. वाडेर, सीईओ डॉ. कौस्तुभ दास यांची समयोचित भाषणे झाली. सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धा तीन टप्यांमध्ये पार पडली. पहिल्या टप्यात प्रमुख महाविद्यालयांमध्ये प्रचार, प्रसार, विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये सहभाग करून घेण्यासाठी आवाहन व स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात महाविद्यालयीन स्तरावर कल्पनांची सादरीकरण व तिसरा टप्पा जिल्हास्तरवर उत्कृष्ट नवसंकल्पना निवडणे हा होतो. याअंतर्गत महाविद्यालय स्तरावरून 12 विद्यार्थ्यांची निवड जिल्हास्तरीय चॅलेंज स्पर्धेकरीता झाली. 9 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. श्रीमती स्मिता नायर यांनी कार्यक्रमाचे संचलन केले. परिक्षक म्हणून सचिन कुमार राका, डॉ. सुयश कठाडे हे उपस्थित होते.
00000

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!