एकंबा येथे विज पडून एका महिलेचा मृत्यू; शेतकऱ्यावर अस्मानी संकटाचा कोप सुरूच
हिमायतनगर, दत्ता शिराणे। हिमायतनगर तालुक्यातील एकंबा येथे विज पडून एका 50 वार्षिय महिला शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. हि घटना दि. २९ शुक्रवारी दुपारी तिन वाजताच्या दरम्यान घडली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
गेल्या तीन चार दिवसापासून हिमायतनगर शहर व तालुका परिसरात संतधर पाऊस सुरूच होता दरम्यान आज दुपारी साडेबारा नंतर हिमायतनगर तालुक्यात वादळी वाऱ्यासह तुफान पावसाने हजेरी लावली. यामुळे नदी काठावर अनेक परिसरातील शेतात पाणीच पाणी झाले दरम्यान दुपारी तीन वाजेच्या सुमारास तालुक्यातील एकंबा येथील श्रीमती शांताबाई पुंजाराम खंदारे वय ५० वर्ष ह्या शेतात उडदाच्या शेंगा तोडणीचे काम करीत असताना आकाशात काळे ढग दाटून येवून पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी सदर महिलेने झाडाचा आसरा घेतला मात्र दुर्दैवाने याच ठिकाणी वीज कोसळली आणि यातच शेतकरी महिलेचा मृत्यू झाला.
विजेच्या कडकडाटासह या भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली. एकंबा शिवारात शेतमजूरीचे काम करणाऱ्या श्रिमती खंदारे वय ५० वर्ष यांच्यावर विज कोसळून, त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच हादगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी भेट देऊन तहसीलदार यांना सूचना केले आहेत. हिमायतनगर पोलीस ठाण्यात याबाबत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास हिमायतनगर पोलीस करीत आहेत.
दरम्यान तालुक्यात गेल्या आठवडा भरापासून काही काळाचा अवकाश सोडला तर सातत्याने पाऊस कोसळत आहे. परिणामी खरिपाच्या पेरणीतील पिकाची स्थिती अतिशय नाजूक बनत चालली आहे. सातत्याने होत असलेल्या पावसाने बळीराजा मेटाकुटीस आला आहे. अचानक विज कोसळून झालेल्या मृत्यूमुळे एकंबा गावावर शोककळा पसरली आहे. या दुःखातून सावरण्यासाठी शासनाने मयत महिलेच्या कुटुंबियांना तात्काळ मदत मिळवून द्यावी अशी मागणी गावकऱ्यातून केली जात आहे.