हिमायतनगरीतील वार्ड क्रमांक ५ मध्ये अतिक्रमण करून होत असलेल्या बांधकामाला अभय कुणाचे..? जनतेचा सवाल
हिमायतनगर,अनिल मादसवार| शहरातील वार्ड क्रमांक ५ मध्ये बांधकामाच्या माध्यमातून होत असलेल्या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात येऊन कार्यवाही करावी. अशी मागणी या भागातील काही नागरिकांनी हिमायतनगर नगरपंचायतला निवेदन देऊन महिन्याभरापूर्वी केली आहे. मात्र अद्यापही नगरपंचायतीने संबंधित अतिक्रमण धारकावर कोणतीही कारवाई केली नसल्याने आगामी काळात या रस्त्याने रहदारी करताना वाहतुकीला व नागरिकांना मोठी अडचण निर्माण होणार आहे. तात्काळ सदरील होत असलेले अतिक्रमण काढण्यासाठी बांधकाम थांबवून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा नगरपंचायतीसमोर आम्हा नागरिकांना लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल असा इशारा या भागातील नागरिकांनी दिला आहे.
हिमायतनगर नागरपंचायतीअंतर्गत येणाऱ्या वॉर्ड क्रमांक ५ मध्ये खूब चौक ते शेख अलीम यांच्या घराकडे जाणाऱ्या रत्स्यावर अ.आहद अ.करीम यांच्याकडून घराचे बांधकाम हे अतिक्रमण करून केले जात आहे. अतिक्रमण करून होत असलेले बांधकाम थांबवून रत्स्याने ये – जा करणाऱ्या नागरिकांची होणारी फजिती थांबवावी अशी मागणी दि.२५ नोव्हेंबर रोजी हिमायतनगर नगरपंचायतीला शेख अलीम यांनी तक्रार देऊन केली होती. त्यानंतर दि.०१ डिसमेंबर २०२४ रोजी फेरोज खान यांनी निवेदन देऊन रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात यावे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल अश्या आशयाचे निवेदन दिले होते. आतापर्यंत अतिक्रमण काढण्यासाठी दोन वेळा येथील नागरिकांनी निवेदन दिले असून, कोणतीही कार्यवाही झाली नाल्याने तिसऱ्यांदा दि.२० डिसेंबर २०२४ रोजी नगरपंचायतीला तक्रार देऊन नगरपंचायतीने कोणती कार्यवाही केली, संबंधित अतिक्रमण धारकास दिलेली नोटीस व कार्यवाहीच्या अहवालाच्या प्रतीची झेरॉक्स मागितली आहे.
एकूणच या प्रकारावरून नगरपंचायतीचे प्रभारी अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक व कर्मचारी वर्गाकडून सदरील अतिक्रमणधारकांना पाठबळ देत असल्याचे सिद्ध होऊ लागले आहे. एरवी शहरात मोजक्या ठिकाणच्या चौकात मोठा पोलिसांचा फौज फाटा घेऊन अतिक्रमण काढण्यासाठी नगरपंचायतीचे हेच अधिकारी कर्मचारी जातात. मात्र वार्डातील अगोदरच असलेल्या लहान रस्त्यावर अतिक्रमण होत असल्याचे नागरिकांनी तक्रार देऊनही ते अतिक्रमण थांबविण्यासाठी किंवा काढण्यासाठी कोणतीही कार्यवाही केली जात नाही. यावरून नगरपंचायतीमध्ये कार्यरत असलेले अधिकारी कर्मचारी हे शासनाचा गलेलठ्ठ पगार घेऊन आणि कोणाच्यातरी दबावाला बळी पडून आपल्या कर्तव्यात कसूर करत आहेत का..? असा प्रश्नही या भागातील जनतेला पडला आहे. मनाची जाणितर किमान ज्यांची तरी लाज बाळगून वॉर्ड क्रमांक ५ मधील अतिक्रमण तात्काळ काढण्यात आले नाही तर नगरपंचायतीच्या विरोधात जन आंदोलन उभारावे लागेल असा इशाराही या भागातील नागरिकांनी दिला आहे. देण्यात आलेल्या निवेदनावर शेख आलिम, फेरोज खान, शेख जबी, शेख असिफ, शेख सिद्धीक, यांसह परिसरातील नागरिक रहिवासी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
मागील वर्षभरापासून शहरातील एका घरकुल धारकाच्या ओट्याच्या बांधकामावरून त्या घरकुलाचे काम नगरपंचायतीने वर्षभरापासून थांबून ठेवले आहे. तर अनेक नागरिकांच्या तक्रारीनंतर देखील नगरपंचायतिच्या तत्कालीन नगरसेविका यांचे प्रतिनिधी कडून होत असलेल्या अतिक्रमण काढण्याकडे नगरपंचायतीचे अधिकारी कर्मचारी का..? आणि कोणाच्या सांगण्यावरून दुर्लक्ष करत आहेत. असा सवाल वॉर्ड क्रमांक ५ मधील जनतेतून विचारला जात आहे. यामुळे नगरपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या प्रकाराकडे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी लक्ष देऊन हिमायतनगर नगरपंचायतीत होत असलेल्या आलबेल व दुटप्पी कारभाराची चौकशी करून सर्वसामान्य नागरिकांच्या आवश्यक प्रश्नावर पारदर्शक कामकाज करण्याच्या तात्काळ सूचना द्यावा. आणि हिमायतनगर नगरपंचायतीला कायमस्वरूपी मुख्य कार्यकारी अधिकारी देण्यात येऊन येथील प्रभारी कारभाराला लगाम लावावा जेणेकरून तत्कालीन पदाधिकाऱ्याकडून हिमायतनगर नगरपंचायतीमध्ये होत असलेल्या ढवळाढवळीच्या कार्यक्रमाला अंकुश बसेल आणि पारदर्शक कामकाजामुळे सर्वसामान्य जनतेच्या हिताची कामे मार्गी लागतील अशी मागणीही शहरातील सुजाण नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व विकास प्रेमी जाणतेतून व्यक्त केली जात आहे.
हिमायतनगर नगरपंचायतीच्या प्रशासक व प्रभारीमुळे चालतो आंधळा कारभार..
हिमायतनगर नगरपंचायतीच्या निवडणूक मागील ३ वर्षांपासून लांबणीवर पडल्या आहेत. येथील नगरपंचायतीचा कार्यकाळ संपून गेल्यानंतर काही लोकांनी राजकीय स्वार्थापोटी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण केल्यामुळे तीन वेळा आरक्षण काढण्यात आले. त्यात दोन वर्ष लोटली आत तिसरे वर्ष सुरु होण्याच्या मार्गावर असताना देखील निवडणूक जाहीर झाल्या नाहीत त्यामुळे हिमायतनगर नागरपंचायतीवर प्रशासक राज आहे. प्रेक्षकाच्या काळात हिमायतनगर शहरात कोट्यवधींची विकासकामे झाली. मात्र या कामाची गुणवत्ता प्रशासक व प्रभारी अधिकाऱ्याच्या स्वार्थीवृत्तीमुळे ढासळली आहे. शहरातील नळयोजनेचे काम तर पूर्ण होईल कि नाही…आणि जनतेला पाणी मिळेल कि नाही… याची अशाच नागरिक जनतेनी सोडली आहे. यंदा दिवाळीपासूनच पाणी टंचाईचं प्रश्न उभा असताना देखील नगरपंचायत प्रशासन यावर काहीच उपाय करत नसल्याने अनेक भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहेत. नगरपंचायतीच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात भूखंडाचे श्रीखंड चाखण्याची प्रयत्न प्रशासक व प्रभारी अधिकाऱ्याला हाताशी धरून चालविला जात आहे. त्यामुळे गावठाणमध्ये नसताना देखील नमुना नंबर ४३ देऊन धुमधडाक्यात प्लॉटिंगची रजिस्ट्री करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत आहेत. एकूणच हिमायतनगर नगरपंचायतीच्या प्रशासक व प्रभारीमुळे सर्व आंधळा कारभार चालत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत प्रभारी मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सुट्ट्यामुळे त्यांचा सम्पर्क होऊ शकला नाही.