नांदेड| भारताने जगाला शून्याचा शोध लावून दिला. त्यामुळे जागतिक पातळीवर देशाचे नाव झाले. गणित विषयात झालेले संशोधन आश्चर्यकारक आहे. परंतु जगाच्या अर्थव्यवस्थेचे सर्व गणितं सोडवताना राबराब राबणा-या शेतक-यांच्या आर्थिक उन्नतीचे गणित कधी सोडविणार असा सवाल राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री डी.पी.सावंत यांनी आज येथे व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य गणित अद्यापक महामंडळाचे 43 वे दोन दिवशीय राज्यस्तरीय गणित अध्यापक अधिवेशनाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलता होते. यावेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आ.अमरनाथ राजूरकर, नांदेड दक्षिणचे आ.मोहन अण्णा हंबर्डे, स्वागताध्यक्ष डॉ.गणेशराज सोनाळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील श्रीवास्तव, , माजी सभापती बालाजी पांडागळे, काँग्रेसचे प्रवक्ते संतोष पांडागळे, मराठवाडा शिक्षक संघाचे सूर्यकांत विश्वासराव, राज्य मुख्याध्यापक संघाचे सचिव अशोक मोरे, कार्यवाह शिवशरण बिरादार, गणित अध्यापक मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यन्नावार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना माजी मंत्री डी .पी. सावंत म्हणाले की, शेतीत आता राम राहिला नाही. बहुसंख्येने शेती करणारा मराठा समाज त्यामुळेच आता आरक्षणाची मागणी करत आहे. शेतक-यांचे प्रश्न हे सरकार कधी सोडवणार असे ते म्हणाले. नवीन शैक्षणिक धोरण देशाला देताना कुठल्याच गोष्टीचा विचार केला नाही. अद्याप अनेक महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या विषयांच्या 30 टक्के जागा भरणे बाकी आहे. या सरकारने नोटबंदी किंवा जीएसटीचे धोरण अचानक घोषित केले कुठल्याही बाबींचा विचार केला नाही. परंतु नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असे अचानक घोषित करता येत नाही. त्यासाठी पूर्वतयारी करावी लागते. यासाठी सरकारने अर्थसंकल्पात तरतूद करणे भाग आहे. ही तरतूद करण्यात आली नाही. तरतूद वाढविण्याकडे सरकारचा कलही दिसत नाही. यातून हे धोरण राबविण्याची शासनाची चालढकल होत असल्याचे दिसत आहे. या धोरणाची 2023 मध्ये याची अंमलबजावणी होणे आवश्यक होते. पण ती अद्याप झाली नाही.
यावेळी बोलताना स्वागताध्यक्ष प्रा. डाॅ. गणेशराज सोनाळे म्हणाले की, अत्यंत अडचणीच्या काळात श्री पाठक सरांसारख्या गुरूजींनी माझ्या आयुष्यात मला केवळ अभ्यास शिकविला नाही तर जीवन जगण्याच्या गणिताचा मूलमंत्र दिला. त्यामुळे मी गणिताचा विद्यार्थी नसताना सुद्धा आयुष्याचे गणित केवळ त्यांच्यामुळे सोडवू शकलो, असे भावोदगार त्यांनी काढले. प्रारंभी महात्मा फुले हायस्कूल विजयनगर च्या लेझिम पथकातील विद्यार्थ्यांनी क्रीडा शिक्षक कऊटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेख लेझिम नृत्य सादर केले आणि संगीत शिक्षिका सौ.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेल आवाजात स्वागत गीत सादर केले. यावेळी कार्यवाह शिवशरन बिराजदार यांनी अधिवेशनाची भूमिका मांडली.
आर. जी. जाधव व सौ.अनघा नांगरे -जाधव यांनी सूत्रसंचलन तर जिल्हा अध्यक्ष प्रशांत यन्नावार यांनी उपस्थितांचे आभार मानले. दुपारच्या सत्रात मा.रविंद्र येवले (फलटण) यांनी ‘गणित सर्वांसाठी’, डॉ. वेदप्रकाश मिश्रा (कराड) यांनी’गणिताचे तत्वज्ञान’ व नागेश मोने(वाई) यांनी ‘या सो रि ना का’अशा विषयावर व्याख्यानातून सर्व गणित प्रेमी व गणित शिक्षकांना गणिताच्या विश्वातील गमती जमती व गणित सोपे करुन कसे शिकवावे याविषयी मार्गदर्शन केले. शेवटच्या सत्रात ‘वऱ्हाड निघालय लंडनला’ हा साहेबराव पावडे यांचा एकपात्री नाट्य प्रयोग व उपस्थित शिक्षकांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. गणित विषयक साहित्य, पुस्तके यांच्या स्टॉलवर गणित प्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सदरील अधिवेशन राज्य सल्लागार जे.पी.मुंडे तसेच नांदेड जिल्हा कार्यकारिणी यांच्या परिश्रमातून यशस्वीरीत्या पार पडला.