मतदान हा महत्त्वाचा अधिकार; या अधिकाराचा वापर प्रत्येकांनी करावा मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल मुलाखत
नांदेड| लोकसभा मतदार संघामध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जनजागृती केली जात आहे. यासाठी नोडल अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान जनजागृती या विषयी मिलिंद व्यवहारे यांनी घेतलेली मुलाखत नांदेड आकाशवाणी केंद्रावरुन नुकतीच प्रसारित झाली आहे. ही मुलाखत वाचकांसाठी देत आहोत.
नांदेड लोकसभा मतदार संघामध्ये येत्या 26 एप्रिल रोजी मतदान घेतलं जाणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी केली जात आहे. विशेष करून नांदेड जिल्ह्यामध्ये मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी जिल्हा प्रशासन स्वीपच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत. यामध्ये नवोदित मतदार, महिला, युवक, सर्वापर्यंत ही यंत्रणा पोहोचत आहे. मतदान जनजागृतीसाठी नोडल अधिकारी म्हणून नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांची जिल्हाधिकारी महोदयांनी नियुक्ती केली आहे. ग्रामीण भागामध्ये करनवाल यांनी ग्रामीण भागातील मतदारांना विविध कार्यक्रम घेऊन त्यांना प्रोत्साहित करत आहेत. त्याच्या आकाशवाणी मुलाखतीचे प्रश्नोत्तरे.
प्रश्न – नांदेड लोकसभा मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणूकीतील मतदान वाढवण्यासाठी ग्रामीण भागात काय उपक्रम सुरू आहे?
उत्तर– निवडणूक म्हणजे एक प्रकारचा सण, उत्सव आहे. मागच्या वेळी नांदेड लोकसभेसाठी 65 टक्के मतदानाचे प्रमाण होते. यावर्षी आमचे जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी 80 टक्के किंवा त्यापुढे मतदानाचे उद्दिष्ट आम्हाला दिले आहे. हे उद्दिष्ट आम्हाला कसे प्राप्त करता येईल यावर आम्ही सर्व काम करत आहोत. जिल्हा परिषदेने मतदान जनजागृतीसाठी वेगवेगळे उपक्रम घेतले. आम्ही सोशल मीडिया कॅम्पियन केलं आम्हाला सोशल मीडिया, ट्विटरवर अनेक युवकांनी मी मत का देणार या विषयावर एक एक मिनिटाचा व्हिडिओ टाकला त्यात त्यांनी मत तर टाकायचं पण का टाकायचं याचा सुद्धा उल्लेख होता. त्या माध्यमातून एक उत्सुकता निर्माण झाली.
नंतर आम्ही वेगवेगळ्या कॉलेजमध्ये अर्धा तासाचे चर्चासत्र ठेवत आहोत. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी आम्हाला विचारतात की, आम्हाला वोट का द्यायचं तर त्या प्रश्नांची उत्तर मी देते. प्रत्येक गावात बचत गटाचे ग्राम महासंघ आहेत. या महासंघाने दिनांक 3 एप्रिल रोजी एकाच वेळेस म्हणजे सकाळी 11 वाजता जिल्ह्यात सुमारे दोन लाख महिलांनी मतदानाची शपथ घेतली. मला वाटते महिला यामध्ये मागे राहणार नाहीत. विशेष करून यासाठी चित्रकला स्पर्धा, रॅली, ईको फ्रेंडली मतदान केंद्र, मतदान शपथ, सेल्फी पॉइंट, महाविद्यालयातून विद्यार्थ्यांसाठी संवाद, पोस्टर आदी माध्यमातून मतदानाची जागृती केली जात आहे.
प्रश्न– मी मतदान का करणार आहे याविषयी आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्याचे म्हटले आहे. या उपक्रमाला कसा प्रतिसाद मिळाला आणि जे नव मतदार आहेत ते जास्तीत जास्त सहभागी झाले पाहिजे यासाठी काय सांगाल.
उत्तर– मी नेहमी मुलांशी जेव्हा चर्चा करते तेव्हा त्यांनी सांगितले की, जर 65 टक्के लोक मत टाकतात तर बाकीचे राहिलेले 35 टक्के त्या 65 टक्क्यांच्या निर्णयाच्या खाली असतात. तुमच्या डेली जितक्या गोष्टी असतात जीवनाच्या, म्हणजे तुम्ही कॉलेजला जाता तर रोड चांगले आहेत की नाही, तुम्ही मार्केटला जाता तर तिथे कचऱ्याची काय व्यवस्था आहे हे तुमचे नेहमीचे मुद्दे असतात. त्यांना सांगते की जर तुम्ही मत करणार नाही तर उद्या तुम्हाला तुमची कंप्लेन करायची सुद्धा संधी मिळणार नाही. तुम्ही मतदान केले त्यानंतर तुम्ही यावर चर्चा करा आणि विचारा की मत बरोबर टाकलं की नाही. पुढच्या वेळेस कसं करायचं हे एक प्रकारचा निर्णय आहे. ज्यामुळे तुमचे जीवन आणि तुमच्या आजूबाजूचे वातावरण आहे हे कसं राहणार आहे याचा निर्णय या मार्फत घेता येईल.
प्रश्न– नारीशक्ती महत्त्वाचा विषय आहे आणि हा समाजातला प्रमुख घटक आहे. यासाठी आपण जिल्हा परिषदेच्या वतीने मतदान शपथ घेण्यासंदर्भात आवाहन केला होतात त्याला देखील महिलांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. यावर्षी महिला मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे या संदर्भाने आपण काय सांगाल.
उत्तर– मी महिलांना नेहमी सांगते की, तुम्ही एक गट म्हणून तुमच्या विषयीचा विचार करा. गावात तर महिलांचे आरोग्याचे विषय असतील, शिक्षणाचे विषय असेल तर तुमचे प्रतिनिधी ते सांगतात. ते सांगत नसतील तर ते सांगायला सांगा. ही चर्चा मताची असते ती फक्त मताच्या दिवशी असत नाही. जेव्हा प्रतिनिधी फिरतात, मत मागायला येतात तेव्हा या मुद्द्याची चर्चा झाली पाहिजे की, महिलांसाठी महत्त्वाचे जे मुद्दे आहेत त्यांनी त्यांच्या अजेंड्यावर घेतले का या मुद्द्यावर आपण काम करणार आहोत का. महिलांनी विचार केला पाहिजे की त्यांचे जे मुद्दे आहेत गावांचे प्रश्न आहेत त्यावर सुद्धा विचार एखादा प्रतिनिधी करतोय की नाही हे देखील पाहिले पाहिजे.
प्रश्न– दि.26 एप्रिल 2024 रोजी मतदान आहे. या दिवशी शुक्रवार आहे. जोडूनच शनिवार रविवार येतोय. सुट्टी आहे म्हणून सुट्टीचा आनंद घेण्यासाठी काही मतदार जाऊ शकतात त्यांना काय सांगाल.
उत्तर– जे युवक गावापासून लांब राहतात त्यांना एक संधी आहे की, त्यांनी गावात यावे आणि मतदान करावे. मला तर असं वाटते की सुट्टी जरी नसेल तर त्यांनी सुट्टी घेऊन यायचं आहे. गावकऱ्यांना असं म्हणायचं मला की, तुमच्या गावाचे युवक युवती मतदान करायला आले तर त्यांचा कुठेतरी सत्कार झाला पाहिजे.
प्रश्न– मतदानाचा टक्का वाढावा ही केवळ शासनाचीच बाब नव्हे तर जनतेने देखील मतदान जनजागृती करणे आवश्यक आहे.
उत्तर– मतदान ही सर्वांची जबाबदारी आहे. गावातले जे ऍक्टिव्ह लोक असतात त्यांना माझे आवाहन देखील आहे, महिलावर्ग असो किंवा एखादा मागासवर्ग असो किंवा नवीन अठरा वर्षाचे युवक आहेत, त्यांना मत टाकण्यासाठी प्रेरणा नाही तसा उत्साह नाही तर जे गावात लोक आहेत त्यांना समजते की मत का टाकायचं आहे. त्यांनी तिथे सर्वांना प्रेरणा दिली पाहिजे, मार्गदर्शन केले पाहिजे, त्यांना समजावयला पाहिजे. शेवटी ही जबाबदारी समाजाची आहे. उद्या प्रतिनिधी तुमच्या चॉईसचा आला नाही आणि निर्णय तुमच्या विरोधात घेतले तर तुम्हाला उलट वाईट वाटणार. जे गावातील ॲक्टिव्ह जे गावकरी असतात त्यांनी सुद्धा यासाठी पुढाकार घेऊन सर्वांना मतदान करण्यासाठी प्रेरणा द्यावी, अशी माझी विनंती आहे.