बालविवाह होणार नाहीत यासाठी समाजाचीही दक्षता अत्यावश्यक – उपविभागीय अधिकारी विकास माने
नांदेड। बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे. सशक्त समाज निर्मितीसाठी बालविवाह हा मोठा अडसर असून सामाजिक जबाबदारीचे भान प्रत्येकाने ठेवून बालविवाह जर कुठे होत असतील तर ते रोखण्यासाठी हिरीरीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन नांदेड उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी केले. आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त तहसिल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी आर.आर. कांगणे, नेहरु युवा केंद्राच्या समन्वयक चंदा रावळकर, बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे, शिक्षण विभागाच्या सविता अवातिरक, युनिसेफच्या प्रकल्प समन्वयक मोनाली धुर्वे, जिल्हा समन्वयक अरुण कांबळे, जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठानचे जगदिश राऊत यांची उपस्थिती होती.
शासनाच्यावतीने महिला सक्षमीकरणावर भर देण्यात येत असून याबाबत अनेक महत्वपूर्ण निर्णय राज्यशासन घेत आहे. आंतरराराष्ट्रीय बालिका दिन व नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुलींच्या सक्षमीकरणासाठी शासनाने लेक लाडकी योजना राबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. लाखो मुलींना या योजनेचा लाभ होणार आहे. विविध योजनाच्या माध्यमातून भर देण्यात येत असल्याचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी सांगितले.
जिल्ह्यात कुठेही बालविवाह होवू नयेत. बालविवाह होत असल्याचे आढळल्यास तात्काळ रोखण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशिल राहावे, असेही त्यांनी आवाहन केले. त्यांनी उपस्थितांना बालविवाह निर्मूलनाची शपथ दिली.