नांदेडमध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांचा ताफा मराठा आंदोलकांनी अडवण्याचा प्रयत्न केला

नांदेड| मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरु केल्यानंतर मराठा आरक्षणाच आंदोलन आता अधिक तीव्र होऊ लागल आहे. नांदेडमध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांचा ताफा मराठा आंदोलकांनी शनिवारी अडवण्याचा प्रयत्न करत काळे झंडे दाखवून शासनाचा निषेध केला आहे.
केंद्रीय मंत्री भागवत कराड शनिवारी सकाळी रोजगार मेळाव्यानिमित्त नांदेडच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी मराठा आंदोलकांनी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. मराठा आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा आदी जोरदार घोषणाबाजी करून आरक्षण आमच्या हक्कच नाही कुणाच्या बापाचं अश्या घोषणाबाजी करत आंदोलन केलं. यावेळी मंत्र्याच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांची धावपळ झाली काही वेळ येथे गोंधळ उडाला होता.
आंदोलकांनी भागवत कराड यांचा ताफा विमानतळावरून हमरस्त्यावर येताच अडवला. त्यानंतर पोलिसांनी लगेच आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यानंतर कराड यांचा ताफा कार्यक्रमस्थळाकडे मार्गस्थ झाला. उल्लेखनीय बाब म्हणजे नांदेडसह राज्यातील बहुतांश गावात मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यानंतरही गावात येणाऱ्या नेत्यांना मराठा समाजाच्या रोषाला बळी पडावे लागत आहे.
नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना नुकताच याचा अनुभव आला. खासदार चिखलीकर गुरुवारी रात्री कंधार तालुक्यातील अंबुलगा येथे गेले होते. या गावात नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. त्यानंतरही ते गावात आल्यामुळे तेथील मराठा समाजाच्या संतापाचा बांध फुटला. त्यांनी चिखलीकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांच्या ताफ्यातील वाहनांची तोडफोड केली. यामुळे चिखलीकर यांना आल्यापावली परत फिरावे लागले. तसेच हिमायतनगर येथे मराठा आंदोलकांनी बीआरएसचे नेते गंगाधर पाटील चाभरेकर यांच्या वाहनांची तोडफोड केली होती.
तसेच नांदेड यवतमाळ सीमेवरील हदगाव- उमरखेड मध्यभागी 10 ते 12 अज्ञात व्यक्तींनी एसटी बस पेटवल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली होती. या बसमध्ये 72 प्रवाशी प्रवास करत होते. हल्लेखोरांनी या सर्वांना खाली उतरवून बस पेटवून दिली. हल्लेखोर नेमके कोण होते? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण या घटनेचा संबंध मराठा आरक्षणाच्या आंदोलनाशी जोडला जात आहे. या घटनेत बस पूर्णतः भस्मसात झाल्याने महामंडळाचे मोठा नुकसान झालं आहे.
