आज ललिता पंचमी निमित्त अनेक कलाकारांनी आपली सेवा मातेचरणी अर्पण केली
उद्या मातेला पांढर्या रंगाचे महावस्त्र अर्पण
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक पुर्णपीठ असलेल्या माहूर गडावरील श्री रेणुकादेवीच्या दरबारात ललिता पंचमीचे औचित्य साधून महाराष्ट्रातील अनेक मान्यवर व प्रतिभावान कलाकारांनी आपली कला आविष्कारांच्या माध्यमांतून मातेचरणी आपली सेवा अर्पण केली आहे.
आजच्या पाचव्या माळीला सनई,चौघडयाच्या मंगल आवाजात “उदो उदो अंबाबाईचा उदो “बोल भवानी की जय ” च्या जय घोषात सकाळी ७ वाजता श्री. रेणुकामातेच्या वैदिक महापूजेस प्रारंभ झाला होता.आज मातेला विविध फळाचा आरास घालण्यात आला. महानैवद्य अर्पण करून आरती करण्यात आली व छबीना काढण्यात आला.मातेला आज पांढर्या रंगाचे महावस्त्र चढविण्यात आले होते. श्री दुर्गासप्तशती शतचंडी पाठ, वेदपारायण, फुलोरा व पायस नैवेद्य (लोणी) महाआरती करण्यात आली व सायकाळी,ललिता पंचमी जागरणास प्रारंभ झाले होते.
आजच्या विधीचे पौरोहीत्य भवाणीदास भोपी,शुभम भोपी,अरविंद देव यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी विश्वस्त चंद्रकांत भोपी,संजय कान्नव, दुर्गादास भोपी यांची उपस्थिती होती.आज ललिता पंचमी असल्याने मंदिर परिसर श्रोत्यांनी व भाविकांनी फुलला होता.दि.६ आॅक्टोबर रोजी रविवारची सुट्टी असल्याने भाविकांनी अलोट गर्दी केली होती.परंतु ललीत पंचमी असतांना देखील भावीकांची गर्दी फारशी नसल्याने मंदिर प्रशासनासह यात्रेशी निगडीत असलेल्या सर्वच विभागाने सुटकेचा श्वास घेतल्याचे पाहावयास मिळाले.
श्री रेणुका मातेच्या दरबारात ललीत पंचमी निमित्त स.१० वा. बोधडी येथील अंधशाळेच्या गायकांनी गायलेल्या अभंग,गोंधळ, पद व भक्तीगीतांचा भाविकांनी मनमुराद आनंद लुटला. दु.१२ वा.हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी सुमारे ५० कार्यकर्त्यां समवेत श्री रेणूका मातेचे दर्शन घेतले.मंदिर प्रशासनाच्या वतीने कोषाध्यक्ष तथा तहसीलदार किशोर यादव,विश्वस्त चंद्रकांत भोपी,संजय काण्णव यांनी त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.