
नांदेड| प्रत्येकाकडे पैसे असतात, परंतु ते देण्याची दानत असायला हवी, सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून आमदार राम पाटील रातोळीकरांनी ती दानत दाखवली, वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांनी हाती घेतलेला उपक्रम स्तुत्य आहे, असे गौरवोद्गार भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी काढले. रातोळी ता. नायगाव येथे महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि आ.राम पाटील रातोळीकर यांचे वडील कै.बालाजीराव मारोतराव पोलीस पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत मुलींना खाते वाटप व बचत गटाशी सुसंवाद कार्यक्रमात त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. याप्रसंगी हभप चंद्रकांत महाराज लाठकर यांचे सुश्राव कीर्तन व शिवजयंतीचे औचित्य साधून शिवचरित्र ग्रंंथांचे वाटपही करण्यात आले.
त्या म्हणाल्या, आ. रातोळीकर यांची दिल्ली येथे भेट झाली आणि त्यामुळे मला या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. मी तात्काळ त्यांचे निमंत्रण स्वीकारले आणि दिल्लीहून थेट या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले.लहान मुलींच्या भविष्याचा विचार करून आ. रातोळीकरांनी हा उपक्रम हाती घेतला, मला खूप आनंद झाला, या शब्दात त्यांनी कार्यक्रमाचे कौतुक करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विचार आणि त्यांचे कार्य आ. रातोळीकर यांच्या हातून सदैव घडत राहो, अशा सदिच्छा चित्राताई वाघ यांनी दिल्या. याप्रसंगी सुकन्या समृद्धी योजनेतील लाभार्थ्यांना चित्राताई वाघ यांच्याहस्ते पासबूक वाटप करण्यात आले. उपस्थित बचत गटांशी त्यांनी संवादही साधला.
हा कार्यक्रम घेण्यामागची भूमिका विषद करताना आ. राम पाटील रातोळीकर म्हणाले, कै.बालाजीराव पोलीस पाटील रातोळीकर यांच्या स्मरणार्थ आपण अनेक उपक्रम राबवित आलो आहोत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बेटी बचाव, बेटी बढाव’ हा दिलेला नारा विचारात घेऊन मुलींसाठी असलेल्या सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत आज दोन हजार खाती उघडून दिले, यापुढेही आपण आमदार असू किंवा नसू तरीही हा उपक्रम अखंडितपणे सुरुच ठेवण्याचा संकल्प केला आहे. राजकीय क्षेत्रात असलो तरी 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण ही भूमिका ठेवूनच काम करीत आलो आहे. परमेश्वराचे आशीर्वाद आणि आई-वडिलांच्या पुण्याईने समाजसेवेची ही संधी प्राप्त झाली आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या कल्यामकारी योजना आणि आमचे मार्गदर्शक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विचारधारा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोंचविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही आ. राम पाटील रातोळीकर यांनी दिली.
याप्रसंगी खा.भास्करराव पाटील खतगावकर,बालाजीराव पाटील आंबुलगेकर, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, सुभाषराव साबणे,प्रणिताताई देवरे-चिखलीकर,दिलीपराव पाटील बेटमोगरेकर,चैतन्य बापु देशमुख,हानमंतराव पाटील चव्हाण,चित्ररेखाताई गोरे, वैशालीताई मिलिंद देशमुख, संध्याताई राठोड, बालाजीराव बच्चेवार,सचिन पाटील हाकळीकर,बापुराव पाटील जांभळे,बळवंतराव पाटील बेटमोगरेकर, खुशाल पाटील उमरदरीकर, गंगाधर राठोड, संजय कुलकर्णी,अशोक पाटील मुगावकर,बालाजी पाटील कबनुरकर,सतीश गौड, बालाजीराव देशपांडे,सीए गोपाल शर्मा, शिवाजीराव कनकंटे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कीर्तन व शिवचरित्र ग्रंथ वाटप
80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या न्याय भूमिकेतून आ. राम पाटील रातोळीकर यांनी आजपर्यंत विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीचे औचित्य साधून हभप चंद्रकंत महाराज लाठकर यांच्या मधूर वाणीतून आयोजित कीर्तनाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.यावेळी शिवचरित्र ग्रंथांचे वाटपही करण्यात आले. यानिमित्त आयोजित महाप्रसादाचा पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी लाभ घेतला.धार्मिक कार्यक्रमांत पुढाकार
धार्मिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहणारे आ. राम पाटील रातोळीकर यांची ईश्वरावर अपार श्रद्धा आहे. अयोध्येतील प्रभू श्रीराम मुर्ती प्रतिष्ठापणादिनी त्यांच्यावतीने पितळी धातूच्या हजारो श्रीराम मुर्तींचे वाटप करण्यात आले. एवढेच नव्हे तर गावातील महादेव मंदिराचा कलशारोहण व मुर्ती प्रतिष्ठापणाही त्यांच्याच पुढाकारातून काही दिवसांपूर्वीच करण्यात आली. ‘साधु-संत येती घरा, तोचि दिवाळी-दसरा’ यावर त्यांचा दृढविश्वास आहे.
