श्री परमेश्वराच्या साक्षीने वाढोण्यात हजारो रामभक्तानी अनुभवाला श्रीरामललाच्या आगमनाचा सोहळा
हिमायतनगर, अनिल मादसवार| आज आयोध्या नगरीत बांधण्यात आलेल्या भव्य मंदिरात श्रीराम लला गर्भगृहात विराजमान झाले आहेत. हा ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळा अनुभवण्यासाठी हिमायतनगर (वाढोणा ) येथील श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे लाईव्ह दर्शन घडून आणले आहे. मंदिराच्या सभागृहात मोठ्या स्क्रीनवर हा लाईव्ह दर्शन सोहळा दाखवीवण्यात आला असून, श्री परमेश्वराच्या साक्षीने वाढोण्यातील हजारो रामभक्तानी श्रीरामललाच्या आगमनाचा सोहळा…याची देही याची डोळा अनुभवाला आहे. बहुतप्रतिक्षेनंतर रामलल्ला आपल्या जागेवर विराजमान झाल्याने जय श्रीराम… जय जय श्रीरामच्या जयघोष आणि फटाक्याच्या आतिषबाजीने मंदिर परिसर दणाणून निघाला होता. तर शहरातील मुख्य रस्त्याने काढण्यात आलेल्या भव्य कलश मिरवणुकीने सर्वत्र भक्तीमय आणि भगवेमय वातावरण निर्माण झाले होते.
श्री परमेश्वर मंदिरात गेल्या सात दिवसांपासून श्रीरामाचा गजर चालू असून, प.पु.स्वामी गजेंद्र चैतन्यजी महाराज यांच्या मधुर वानीतून संगीतमय राम कथा चालू होती. त्यामुळे येथील श्री परमेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते आहे. अयोध्येत श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याच्या निमित्ताने चालू असलेली श्रीराम कथेचा शेवट आणि आयोध्येत संपन्न झालेला प्राणप्रतिष्ठापणा सोहळा एकाच दिवशी हा दुग्धशर्करा योग्य जुळून आला होता. ज्या लोकांना अयोध्येला जात आले नाही त्यांना हिमायतनगर शहरातच आयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळा लाईव्ह दाखविण्याची तयारी श्री परमेश्वर मंदिर कमिटीने केली होती. त्यामुळे मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
आज सकाळ पासूनच शहरात भक्तीमय वातावरण दिसून आले. शहरातील ठिक ठिकाणी श्रीरामाच्या मूर्तीचे देखावे तसेच १६ मंदिरात आरती, महापूजा, प्रसाद व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तर शह्रातूल श्रीराम मूर्ती स्थापने निमित्ताने भव्य शोभा यात्रा निघणार असल्याने महिला गृहिणींनी सकाळीच सडा रांगोळी काढून येणाऱ्या शुभ यात्रेचे स्वागत करण्याची तयारी केली होती. श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्ताने शहरातील मुख्य रस्त्यानी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये राम सीतेची झाकी डोक्यावर कलश घेऊन महिला हजारोच्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. शोभायात्रे दरम्यानं ठिकठिकाणी महाप्रसाद, पेयजल, शरबत वाटप करण्यात आले. शोभा यात्रा शहरातील सराफ लाईन, बजरंग चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कालिंका मंदिर, दक्षिण मुखी हनुमान मंदिर, बाजार चौक, गणेश मंदिर, श्रीराम मंदिर, लाकडोबा हनुमान मंदिरापासून परत श्री परमेश्वर मंदिरात आल्यानंतर शोभा यात्रेचा समारोप करण्यात आला.
आजच्या या सोहळ्यानिमित्ताने श्री परमेश्वर मंदिर कमान व आजूबाजूच्या परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिरात ५ हजार दिवे लावण्यात आल्याने मंदिराचा परिसर उजळून निघाला होता. एकूणच शहरात भक्तीमय आणि भगवेमय वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पहिल्यांदाच पहाव्यास मिळाले. मिरवणूक परत आल्याणावर श्री परमेश्वर देवस्थान मंदिर कमिटीच्या वतीने आयोध्येतील संपन्न झालेला श्रीराम लला प्राणप्रतिष्ठा सोहळा लाईव्ह टेलिकास्ट दाखविण्यात आला. या सोहळ्यात हजारो भाविकांनी श्रीराम ललाचे लाईव्ह दर्शन घेतले.
त्यानंतर दुपारी १.३० वाजता चालू असलेल्या श्रीराम कथेचा समारोप श्रीराम राज्याभिषेक सोहळ्याने करण्यात आला. यावेळी पपु. गजेंद्रचैतन्य महाराज यांच्या हस्ते अयोध्येच्या मंदिरासाठी त्यावेळी गेलेल्या कारसेवकाचा सन्मान करण्यात आला. दरम्यान कथा सुरु असताना हदगाव दत्तबर्डी येथील गोपाळगीर महाराज यांनी श्रीराम कथेला भेट देऊन श्रीराम चरित्र मानस ग्रंथाचे दर्शन घेतले. त्यानंतर काल्याच्या कीर्तनाने श्रीराम कथेचा समारोप करण्यात आला. त्यानंतर सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले आहे. व तसेच गोपाळगीर महाराज यांनी येथे भेट देऊन श्रीराम चरित्र मानस ग्रंथाचे दर्शन घेतले.
एकूणच गेल्या ५०० वर्षाची प्रतीक्षा आजच्या दिवशी राजाराम यांच्या आगमनाने पूर्ण झाल्यामुळे हिमायतनगर शहरात मोठी धुम पहाव्यास मिळाली. तर ग्रामीण भागात देखील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने सर्वच मंदिरात धार्मिक कार्यक्रम व ध्वजाची मिरवणूक काढून गुढ्या तोरणे बांधून घराघरात दिवाळी साजरी करण्यात आली. सायंकाळी प्रत्येक घरात लावण्यात आलेल्या दिव्यामुळे शहर व ग्रामीण परिसर दिव्यांच्या रोषणाईने झगमगून निघाला होता. उत्सव शांततेत व्हावा यासाठी पोलीस निरीक्षक बी. डी. भुसनुर यांनी चोख बंदोबस्त लावला होता.