आर्टिकलनांदेडराजकिय

मराठा समाजाची भूमिका निर्णायक ठरणार

नांदेड लोकसभा निव़णुकीच्या प्रचार तोफा आज थंडावल्या.या निवडणुकीत भाजपाचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर व काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांच्यात सरळ लढत होत आहे. या निवडणुकीत मराठा समाजाची भूमिका निर्णायक राहणार असल्याने हा समाज कोणाच्या पाठिशी उभा राहणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

मराठवाड्यात गेल्या काही महिन्यापासून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मुद्यावर चांगलेच आंदोलन उभे केले. आपले आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नाही. समाजाच्या हितासाठी हे आंदोलन समाजाच्याच बळावर सुरु असल्याचे त्यांनी वारंवार सांगितले. या आंदोलनामुळे मराठवाड्यातील मराठा समाजात चांगलाच असंतोष पसरला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही सर्वच राजकीय नेत्यांची भूमिका आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आदि सर्वच प्रमुख पक्षांनी या आंदोलनाला समर्थन दिले. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला कोणीही विरोध केला नाही. सर्वच राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी या आंदोलनाला पाठिंबा दिला.

मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरुवातीला केवळ मराठवाड्यापुरते आणि मराठवाड्यातील मराठा समजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे या मागणीपुरतेच मर्यादित होते. परंतु नंतर त्यात बदल होत त्याला अनेक फाटे फुटले. तरीही सर्वच राजकीय पक्षाचे नेते त्यांच्या विरोधात न जाता त्यांचे समर्थन करतानाच दिसले. खुदद् मनोज जरांगे यांनीही आंदोलना दरम्यान कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे हे आंदोलन सामाजिक पातळीवर राहिले. त्याचे राजकीयीकरण झाले नाही असा सर्वाचाच समज होता. दुसरी महत्वाची बाब म्हणजे आघाडी सरकारच्या काळात पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. ते न्यायालयात टिकले नाही. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले. ते उच्च न्यायालयात टिकले.

फडणवीस सत्तेतून गेल्यावर उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना सर्वोच्च न्यायालयात ते टिकले नाही. आता एकनाथ शिंदे सरकारने तिसर्यांदा मराठा समाजाला आरक्षण दिले. त्यालाही न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्याचे भवितव्य अद्याप ठरायचे आहे. त्यामुळे राज्यात सरकार कोणाचेही असो सर्वानीच मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मराठा समाजात असंतोष असला तरी त्याचा फटका कोणाला बसणार याचा नेमका अंदाजा कोणालाही येत नसल्याने सर्वच राजकीय पक्ष चिंतेत आहेत. नांदेड लोकसभा मतदार संघात दोन्ही प्रमुख उमेदवार मराठा समाजाचेच आहेत. त्यामुळे मराठा समाजाची भूमिका काय याकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे. या मतदार संघात सर्वाधिक पहिल्या क्रमांकाची मते मराठा समाजाची असल्याने त्यांच्यावर निवडणुकीचे बरेच भवितव्य अवलंबून आहे.

या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे काँग्रेसची अवस्था जर्जर झाली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणासारखा मातब्बर काँग्रेस नेता ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये दाखल झाला असताना काँग्रेस भाजपला चांगलीच लढत देत आहे. भाजपच्या तुलनेत काँग्रेसकडे पुरेसा निधी नाही, कायर्कर्त्याची फळी नाही, संघटना मजबूत नाही, उमेदवार वसंत चव्हाण यांच्या प्रकृतीची गंभीर समस्या आहे. असे असतानाही काँग्रेस लढतीत आली याचे कारण या मतदार संघात गठ्ठा मते असलेला मुस्तीम समाज काँग्रेसच्या बाजुने भक्कमपणे उभा राहिला आहे. एमआयएमचा उमेदवारच यावेळी निवडणुकीत उभा नसल्याने मुस्लीम समाजातील मताचे विभाजन होण्याची शक्यताच राहिली नाही. दलित समाजाची पारंपारिक मते काँग्रेसकडेच राहणार आहेत.

मनोज जरांगे यांच्या आंदोलानामुळे मराठा समाजात जो असंतोष आहे त्याचाही फायदा काँग्रेस खुबीने करुन घेत असल्याची चर्चा आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पद्धतशीर बाजुला ठेऊन भाजपच्या देवेंद्र् फडणवीस यांना लक्ष केले जात असल्याची चर्चा मतदार संघात आहे. याच सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले. ते टिकणारे दिले असल्याचा दावा मुख्यमंत्रीं एकनाथ शिंदे वारंवार करीत आहे. त्याच सरकारमध्ये फडणवीसही आहेत. मग तेच टागर्गट का असाही प्रश्न विचारला जात आहे. त्यामुळेच या मतदार संघातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रचाराच्या पातळीवर भाजपने चांगलीच आघाडी घेतली आहे.

खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपचे राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण, डाँ. अजित गोपछडे यांनी मतदार संघात दौरे करुन मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. यावेळी एमआयएम वंचित बहुजन आघाडीची युती रिंगणात नाही. त्यामुळे मोठे मत विभाजन होण्याचा धोका नसल्याने भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर व काँग्रेसचे वसंत चव्हाण यांच्यात थेट लढत असल्याचे चित्र आहे. मराठा समाजाची भूमिका या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे.

…विनायक एकबोटे, ज्येष्ठ पत्रकार नांदेड, दि. २४.४.२४, मो.नं. ७०२०३८५८११

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!