नांदेड| शाळेत प्रवेश दिल्यानंतर विद्यार्थी घडविण्याची सर्वस्वी जबाबदारी शिक्षकांचीच नाही तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात पालकाची भूमिका महत्वाची असल्याचे प्रतिपादन राजस्थानी शिक्षण संस्थेचे सहसचिव डॉ. लक्ष्मीकांत बजाज यांनी केले.
मुंबई येथील जयवकील फाउंडेशनच्या वतीने बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांसाठी राज्यभर दिशा प्रकल्पांच्या माध्यमातून विशेष अभ्यासक्रम राबविला जातो. याच पार्श्वभूमीवर येथील मगनपुरा भागातील आर आर मालपाणी मतिमंद विद्यालयात शुक्रवार दि. ३ नोव्हेबर रोजी शिक्षक – पालक अभिमुखता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. लक्ष्मीकांत बजाज बोलत होते. व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक नितीन निर्मल, गणेश धुळे, संजय शिंदे, राजेश राजापूरकर आदींची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना लक्ष्मीकांत बजाज म्हणाले की, विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिल्यानंतर त्याच्या प्रगतीचा आलेख पालकांनी तपासावा. तसेच पालक शिक्षक यांच्या समन्वयातूनच विद्यार्थ्यांची प्रगती शक्य आहे.
याप्रसंगी मुख्याध्यापक नितीन निर्मल म्हणाले की, सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अभ्यासक्रमापेक्षा बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यासाठी वेगळा अभ्यासक्रम असतो. अशा विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार अभ्यासक्रम तयार करावा लागतो. अक्षम विद्यार्थी जन्मल्यानंतर ते काही करु शकत नाहीत असा समज पालकांचा असतो हे चुकीचे असून शिक्षक व पालक या दोघांनीही कल्पकतेने सांघिक प्रयत्न केल्यास या विद्यार्थ्यांचाही अपेक्षित विकास होतो असे प्रतिपादन केले.
आपला मुलगा डॉक्टर अथवा इंजिनीअर होणार नाही मात्र शिक्षक व पालकांच्या प्रयत्नातून निश्चित स्वावलंबी होईल यासठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मुख्याध्यापक नितीन निर्मल यांनी सांगितले. या कार्यक्रमास पालक व शिक्षकांची मोठ्या संखेने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या समारोपानंतर शिक्षकांनी गटनिहाय पालकांचे समुपदेशन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे विशेष शिक्षक, निमवैद्यकीय कर्मचारी व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.