नांदेड| शहरातील पूरग्रस्तांच्या समर्थनार्थ माकपने दि.२० डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय आणि मनपा मुख्य कार्यालया समोर तीव्र निदर्शने करून आयुक्त महेशकुमार डोईफोडे व निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांना निवेदने दिली.
जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचे सानुग्रह अनुदान मिळायला पाहिजे म्हणून सीटू कामगार संघटनेने आतापर्यंत १४ आंदोलने केली आहेत. सहा हजार लोकांना अनुदान दिल्याची यादी मनपा आणि जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केली असून नाल्याच्या काठावर आणि कच्च्या घरात राहणाऱ्या खऱ्या पूरग्रस्तांना डावलण्यात आल्याच्या शकडो तक्रारी महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आल्या आहेत.
त्रुटीची राहिलेली पूरग्रस्तांची यादी मात्र अजून महापालिकेने तयार केली नाही. बोगस पूरग्रस्तांचा मुद्दा मागील चार महिन्यापासून नांदेड शहरात गाजत असून महापालिकेच्या वसुली लिपिक आणि तहसीलच्या तलठ्यानी काही निवडक लोकांच्या सांगण्यावरून प्रत्यक्षात पाहणी न करता घरी बसून याद्या तयार करून अनेक चुकीच्या लोकांना अनुदान मिळण्यासाठी पात्र ठरविले आहे. दिवाळीपूर्वी अनुदान आणि अन्न धान्य किट देण्यात येईल असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सीटूच्या शिष्टमंडळास सांगून ३ नोव्हेंबर रोजी उपोषण सोडविले होते परंतु अद्याप पात्र पूरग्रस्तांची दुसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली नाही. दि.३० नोव्हेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर सामूहिक उपोषण सुरु असून प्रशासन खुपच हलक्यात घेत आहे.
चार महिने उलटले तरी अनुदान व रेशन किट मिळाली नाही म्हणजे प्रशासन किती उदासीन आहे हे विचार करायला नको. साधारणतः सहा कोटी रुपयांचा भ्रष्टाचार आणि अनियमितता झाल्याच्या तक्रारी करीत आंदोलने सुरु असल्यामुळे प्रशासनाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू मतदार संघाचे आमदार कॉ.विनोद निकोले आणि केरळचे खासदार कॉ.डॉ.व्ही.शिवदासन यांना देखील निवेदनाच्या प्रति पाठविल्या आहेत.मंत्रालय मुंबई मध्ये नांदेड पूरग्रस्त निधी घोटाळा गाजणार असल्याचे संकेत सीटू संघटनेचे जनरल सेक्रेटरी तथा माकप सचिव कॉ.गंगाधर गायकवाड यांनी दिले आहेत.
राहिलेल्या पूरग्रस्तांची यादी जोपर्यंत प्रसिद्ध होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील आणि उपोषण महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन देऊन सुरु केले आहे. या वेळी कॉ. गंगाधर गायकवाड, कॉ.मारोती केंद्रे,कॉ.सोनाजी कांबळे, कॉ.प्रदीप सोनाळे,सुभाष कोठेकर,सय्यद फातेमा बी, ताहेराबी कुरेशी,खालेदा बी,अविनाश कांबळे,कॉ.मुमताज शेख,शेखअंजुम बेगम, शेख इसाक शेख नबीसाहब,रजिता श्रीनिवास,आदींनी केले आहे. लवकरच त्रुटीची यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आपत्कालीन विभागाचे डॉ.खानसोळे आणि बेग यांनी वर्तविली आहे परंतु अनुभव वाईट असल्यामुळे मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरु राहणार असणार असल्याचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने निश्चित केले आहे.