जैतापूर येथील मातंग समाजातील व्यक्तीच्या अंत्यविधीस पाच तास उशीर
उस्माननगर, माणिक भिसे| लिंबगाव पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या मौजे जैतापूर येथील ज्येष्ठ नागरिक देवराव श्यामराव सरोदे यांचे अल्पशा आजाराने दि.१० फेब्रुवारी सकाळी ११ वाजता राहत्या घरी मौजे जैतापूर ता.नांदेड येथे निधन झाले होते. त्यांचा अंत्यविधी दुपारी तीन वाजता मौजे जैतापूर येथील नेहमीच्या ठिकाणी गोदावरी नदी काठावर ठेवण्यात आला होता.
परंतु अंत्ययात्रा स्मशान भूमी पर्यंत जाण्यासाठी गावातील लोकांनी विरोध केला.आमच्या शेतातून अंत्ययात्रा जाऊ देणार नाही अशी भूमिका गावातील सवर्ण असलेल्या शेतकऱ्यांनी घेतल्यामुळे मातंग समाजातील कार्यकर्ते अडचणीत सापडले होते. विशेष म्हणजे मौजे जैतापूर येथे सरपंच आणि पोलीस पाटील अनुसूचित जातीचे आहेत.मागील अनेक दशकापासून नदी काठावर अंत्यविधी केला जातो. स्मशान भूमी आहे. परंतु जाणीवपूर्वक अडकाठी म्हणून काहींनी विरोध केला आणि पार्थिव पाच तास ताटकळत ठेवत प्रेताची विटंबना झाली.
मयत्ताचे पुतणे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका कमिटी सभासद कॉ.श्याम सरोदे यांनी काहीतरी तोडगा काढून अंत्यविधी करून घेण्यासाठी प्रयत्न केले परंतु काहीच फायदा होत नव्हता.बाहेर गावाहून आलेले नातेवाईक पाच तास रस्त्यावर ताटकळत उभे होते. तेव्हा माकप सचिव कॉ.गंगाधर गायकवाड यांना कॉ.सरोदे यांनी फोनवरून सर्व हकीकत सांगितली. कॉ.गायकवाड यांनी तातडीने स्वप्नील दीगलवार नायब तहसीलदार नांदेड आणि लिंबगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुंजाजी दळवे यांना सविस्तर माहिती देऊन मातंग समाजाच्या मयत व्यक्तीच्या प्रेताची विटंबना होऊ नये आणि अंतविधी सन्मानाने झाला पाहिजे अशी विनंती केली आणि ते जैतापूर येथे पोहचले.
तेव्हा नायब तहसीलदार श्री दिगलवार आणि लिंबगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्री दळवे यांनी आपल्या सहकार्यासह अर्धा ते पाऊण तासात जैतापूर येथे स्वतः उपस्थित होऊन गावातील प्रतिष्ठित नागरिकांसोबत बैठक घेतली. बैठकीत माकपचे सचिव कॉ.गंगाधर गायकवाड यांनी पर्यायी व्यवस्था करण्या संदर्भात आवाहन केले आणि अवघ्या पाच मिनिटात जैतापूर येथील ४० गुंठे गायरान असलेल्या जमिनीवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय झाला. हा निर्णय घेण्यासाठी पोलीस अधिकारी मुंजाजी दळवे आणि नायब तहसीलदार स्वप्नील दिगलवार यांनी आपल्या बुद्धी कौशल्याचा योग्य वापर केल्याने परिस्थिती निवळून पूर्वपदावर आली आणि एकदाची मातंगाच्या मयत देवराव सरोदे यांना सरणासाठी जागा मिळाली. नांदेड तालुक्यातील जैतापूर परिसरात व अनेक गावात आज देखील दलितांना मंदिर प्रवेश नाही तसेच स्मशान भूमी उपलब्ध नाहीत. दलित संघटनांचे पुढारी मात्र या गंभीर विषयाकडे लक्ष देण्यास तयार नाहीत ही शोकांतिका म्हणावी लागेल.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या निर्णायक हस्तक्षेपामुळे नायब तहसीलदार यांच्या उपस्थितीत आणि पोलीस बंदोबस्तात अंत्यविधी पार पडला. लवकरच माकपच्या वतीने जिल्हाभर स्मशान भूमिचे प्रश्न घेऊन आंदोलन उभे करण्यात येईल असे माकप सचिव कॉ.गंगाधर गायकवाड यांनी जैतापूर येथे बोलून दाखविले. या अंत्ययात्रेत प्रा.विजय भिसे, कॉ. दिगंबर घायाळे, वाहेगावचे उप सरपंच दिलीप कंधारे, मानवहित लोकशाही पक्षाचे, व्यंकटराव सोनटक्के,मयत देवराव श्यामराव सरोदे यांचे पुतणे पोलिस पाटील मोतीराम सरोदे,सरपंच सुनिता जाधव,उपसरपंच मनिषा नवरे,ग्रा.पं.सदस्य संजय सरोदे पंडितराव शिंदे, व्यंकटी नवरे, गंगाप्रसाद जाधव, ज्ञानेश्वर जाधव, मानशिंगराव जाधव प्रल्हाद जाधव, धुरजी गोभाडे, ,कशिनाथ सरोदे, गोविंद सरोदे, गुणाजी सरोदे, संभाजी सरोदे, पांडुरंग भिसे,यांच्या सह विविध राजकीय पक्षाचे आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते..