
नांदेड/हिमायतनगर,अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा वनपरीमंडळात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड होत असून, वन विभाग मात्र या बाबींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. परिणामी जंगलाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. दरेगाव परिसरात तर चक्क मिनी आरामिशन चालू असल्याचे सांगण्यात येत असून, येथूनच लाकूड कटाई करूण इतरत्र पाठविण्यात येत आहेत. या भागात कर्तव्यावर असलेल्या वन कर्मचाऱ्यास ठरावीक प्रमाणात हप्ता मिळत असल्यामुळे की, काय? वन विभाग कारवाई करण्यास असर्मथ्रतता दाखवित असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी नागरीकातून केला जात आहे.
तेलंगणा – मराठवाडा सीमारेषेवर असलेल्या हिमायतनगर तालुक्यांच्या टाकराळा, मानसिंग ताडा, दरेगाव, दाबदरी, वायवाडी, पोटा, या भागात चांगल्या प्रकारे जंगल अस्तित्वात असून, सागवानाची संख्या ही बर्यापैकी आहे. परंतू गेल्या काही दिवसांपासून या भागात मोठ्याप्रमाणात अवैध वृक्षतोड होत आहे. सागवान तस्कर तेलंगणा राज्यातून महाराष्ट्राच्या हद्दीत येऊन सागवानाची कत्तल करत असल्याचे सांगितले जात आहे. येथे तोडलेली हि सागवान झाडाची खोड काही दिवस वाळू देऊन पुन्हा दरेगाव परिसरात मिनी आरामिशन वरून कटई करून छोटया मार्गाने पाठविली जात आहे. येथे चालत असलेल्या आरामाशीन असल्यामुळे येथूनच लाकूड कटाई करण्यात येत आहे. तर या आरामिशनला सागवान कटाई करण्याची परवानगी या भागाच्या संबंधित अधिकाऱ्याने दिल्यामुळे कि काय..? परिसरात मोठ्या प्रमाणात सागवान लाकडाचे साठे आढळून येत असल्याचे पर्यावरण प्रेमी नागरिक सांगत आहेत.
ही बाब स्थानिक वन कर्मचाऱ्यांना माहीती आहे. परंतू ते मायेच्या लालसेपोटी कारवाई करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत असून पोटा वन परिमंडळात कर्तव्यावर असलेल्या वनपाल व वनरक्षक यांच्या वर वरिष्ठांचा अंकूश राहीला नसल्याने स्वैराचार वाढलेला दिसून येत आहे. आता जिल्हाउपवनसंरक्षक केशव वाबळे यांनी हिमायतनगर वनपरिक्षेत्र कार्यालयाकडे तात्काळ लक्ष पुरवून अवैध वृक्षतोड थांबवून आरामशिन ताब्यात घेण्यात यावी. अशी मागणी वन प्रेमी नागरिकांतून होत आहे.
