
नियतीचा खेळ कसा विचित्र असतो पहा. गेल्या लोकसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना पराभूत करण्यासाठी तन-मन-धन लावून प्रयत्नांची पराकाष्ठा केली. तेच अशोक चव्हाण या निवडणुकीत प्रताप पाटील चिखलीकर यांना विजयी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. या निवडणुकीत प्रताप पाटील जरी उमेदवार असले तरी खरी परिक्षा अशोक चव्हाणांचीच आहे. यालाच राजकारण असे म्हणतात.
भारतीय जनता पक्षाने यावेळी प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी देऊन पुन्हा संधी दिली. राजकीय उलथा पालथी झाल्या नसत्या तर याही निवडणुकीत पुन्हा एकदा प्रताप पाटील चिखलीकर विरुद्ध अशोकराव चव्हाण अशी पारंपारिक लढत दिसली असती. सध्याची एकूण परिस्थिती पाहता कदाचित यावेळी अशोक चव्हाणांनी प्रताप पाटलांना तगडी झुंज देऊन विजयही मिळविला असता. परंतु नियतीच्या मनात तसे नसावे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाणांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला मोठा धक्का देत राजकीय समिकरणेच बदलून टाकली. या निवडणुकीत अशोक चव्हाणांकडून प्रताप पाटील चिखलीकर पराभूत होऊ शकतात याची चांगली जाण भााजप पक्ष श्रेष्ठींना असल्यानेच त्यांनी पूर्ण जोर लावून अशोक चव्हाणांना भाजपमध्ये आणले आणि प्रताप पाटलांचा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न केला. आता परिस्थिती अशी आहे की, भाजपचे उमेदवार जरी प्रताप पाटील चिखलीकर असले तरी खरी परीक्षा अशोक चव्हाणांची आहे. याचे कारण ऐन निवडणुकीच्या तोंडावर चव्हाण भाजपमध्ये आले आहेत.
या जिल्ह्यावर आपली पकड आहे, चांगले संघटन आहे आणि या जिल्ह्यातील जनता आपल्या पाठिशी आहे हे दाखवून देण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली आहे. गेल्या निवडणुकीपेक्षाही अधिक मताधिक्क्याने यावेळी प्रताप पाटील विजयी झाले तर त्याचे श्रेय अशोक चव्हाणांना मिळणार आहे. भाजप प्रवेशाच्या वेळी त्यांनी राज्यसभेत प्रवेश केलाच आहे. आता प्रताप पाटलांना मोठ्या फरकाने विजय मिळवून देऊन येणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळात आपली वर्णी लावून घेण्याची संधीही चव्हाणांना आहे. त्यानंतर त्यांना आपला वारसही विधान सभा निवडणुकीत प्रस्थापित करायचा आहे. भाजपमध्ये ते नवीन असल्याने त्यांना आपली शक्ती पक्षाला दाखवून देणे भाग आहे. तरच त्यांची पुढची वाटचाल सुकर होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत खऱ्या अर्थाने प्रतिष्ठा चव्हाणांचीच लागली आहे.
गेल्या निवडणुकीत अशोक चव्हाणांचा पराभव प्रताप पाटलापेक्षाही वंचित आघाडीने झाला. त्यावेळी वंचित सोबत एमआयएम पक्षही होता. त्यामुळे मुस्लीम आणि दलित समाजाची मोठ्या प्रमाणात मते प्रा. यशपाल भिंगे यांना मिळाली. ती मते काँग्रेसचीच होती. वंचितमुळे ती मते विभागल्या गेली. त्याचा फटका चव्हाणांना बसला. आता तशी परिस्थिती नाही. अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यामुळे प्रताप पाटलांना ही निवडणूक बरीच सोपी झाल्याचे वाटत असले तरी ते पूर्ण सत्य नाही. काँग्रेसने माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली आहे. वसंतराव चव्हाणांचेही जिल्ह्याच्या राजकारणात बरेच प्रस्थ आहे. पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे त्यांनी विधान परिषदेत प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर काँग्रेस तर्फे त्यांनी विधान सभेतही प्रतिनिधीत्व केले. विशेष म्हणजे त्यावेळी त्यांना अशोक चव्हाणांचा भरघोस पाठिंबा होता. मराठा समाजातून आलेले वसंतराव राजकारणात राहूनही कोणत्याही मोठ्या वादात कधी अडकले नाहीत. त्यांची प्रतिमाही चांगली आहे. विशेष म्हणजे प्रताप पाटील चिखलीकर आणि वसंतराव चव्हाण यांचे सगे सोयरे बऱ्याच प्रमाणात एकच आहेत.
प्रकृतीचा अपवाद सोडला तर वसंतराव चव्हाण प्रताप पाटलांना निवडणुकीत टक्कर देण्यास तसे सक्षम आहेत. दुसरी महत्वाची बाब म्हणजे यावेळी वंचित आघाडी आणि एमआयएमची युती नाही. त्यामुळे गेल्या वेळी झाले तसे मोठ्या प्रमाणात मत विभाजन होण्याची शक्यता नाही. वंचित आघाडीने अँड्. अविनाश भोसीकर या तरुण उमेदवाराला संधी दिली आहे. अविनाश भोसीकर हे चळवळीतील उमेदवार आहेत. अगदी काँलेज दशेपासून त्यांनी अनेक विद्यार्थी आंदोलनात सहभाग घेतला आहे. सत्ताधाऱ्याविरोधात त्यांनी अनेक लहान मोठी आंदोलने केली आहेत. लिंगायत समाजही या मतदार संघात मोठ्या प्रमाणात आहे. त्याचा त्यांना फायदा मिळू शकतो. त्यांनी फार मोठ्या प्रमाणात मते घेतली तर या निवडणुकीचे भवितव्य काही प्रमाणात बदलू शकते. त्यामुळे ते किती उंच झेप घेतात हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.
अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशामुळे प्रताप पाटलांचा फायदा निश्चित होणार आहे. अशोक चव्हाणांचे जिल्ह्यातील राजकीय वजन पाहता ते भाजप मध्ये आल्यानंतर ही लढत एकतर्फीच होण्याची अपेक्षा होती. परंतु तसे होईल अशी आजची परिस्थिती नाही. याची दोन मुख्य कारणे आहेत. त्यातले पहिले कारण या निवडणुकीत मुस्लीम समाजाची गठ्ठा मते यावेळी काँग्रेसकडे वळणार आहेत. या निवडणुकीत एमआयएमचा उमेदवार नाही. त्यामुळे त्यांच्या मतात विभाजन होण्याची शक्यता नाही. दुसरे महत्वाचे म्हणजे विजयाचे प्रमुख दावेदार असलेले प्रताप पाटील चिखलीकर व वसंतराव चव्हाण हे दोघेही मराठा समाजातील आहेत. तथापि मराठा समाजात मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या आरक्षण आंदोलनामुळे तीव्र असंतोष आहे. त्याचा फटका अशोक चव्हाणांना सहकुटुंब बसलेला दिसला आहेच. त्यामुळे ऐन निवडणुकीत मराठा समाजाची काय भूमिका राहणार यावर विजयाचे गणित मोठ्या प्रमाणात अवलंबून असणार आहे. परंतु एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे.
केवळ याच मतदार संघात नाही तर संपूर्ण राज्यात नागरिकांचा एक मोठा वर्ग असा आहे जो केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदीच असावे असे मानणारा आहे. हे कोणाला पटो अथाव न पटो परंतु हे सत्य आहे. राज्यात कोणाचेही सरकार आले तरी चालेल परंतु केंद्रात मोदीच पाहिजेत असे मानणारा वर्ग सर्व वयोगटात आहे. या निवडणुकीत भाजपची खरी ताकद हाच विचार आहे. तो विचार मतदानापर्यत किती प्रबळ होत जातो त्यावर बरेच अवलंबून आहे. तथापि आजच्या घडीला नांदेड लोकसभा मतदार संघात भाजपचे पारडे जड दिसत आहे. पुढे प्रचारात काय रंग चढतो, आरोप प्रत्यारोपाच्या फैरी कशा झडतात, त्यावरुन किती मतपरिवर्तन होते त्यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून राहणार आहे.
….विनायक एकबोटे, ज्येष्ठ पत्रकार नांदेड, मो.नं. ७०२०३८५८११, दि. ४.४.२४.
