
नांदेड। डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नांदेड येथे 2 ऑक्टोबर रोजी घडलेल्या घटनेची तात्काळ गंभीर दखल घेवून रुग्णालयाचे ऑडिट करून आवश्यक त्या सुविधांचे बळकटीकरण करण्याची मागणी आ. राम पाटील रातोळीकर यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नांदेड येथे 2 ऑक्टोबर रोजी 24 तासात सुमारे 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत्तांमध्ये 12 नवजात बालकांचा समावेश आहे. गत 4-5 दिवस सलग सुट्या आल्याने शहरातील काही वैद्यकीय अधिकारी शहराबाहेर आहेत तसेच नांदेड शहरात नजीकच्या सुमारे 6 जिल्ह्यातील रुग्ण येत असल्याने त्यांना शासकीय रुग्णालय व्यतिरिक्त अन्य पर्याय नसल्याने शासकीय रुग्णालयाचा ताण वाढला.
रुग्णालयात येणारे रुग्ण हे सहसा इतर ठिकाणावरून येत असल्याने त्यांची परिस्थिती ही गंभीर ते अतिगंभीर स्वरूपाची असते. त्यामुळे मृत्यूची संख्या वाढल्याचे प्रभारी अधिष्ठाता यांनी सांगितले. तथापि घडलेली घटना ही गंभीर व दुर्दैवी असल्याने चौकशी होणे गरजेचे आहे. शिवाय इतर जिल्ह्यातून व रुग्णालयातून रेफर होणार्या रुग्णांच्या परिस्थितीचे देखील ऑडिट करून रुग्णालय प्रशासनावर येणारा ताण लक्षात घेता तज्ञ वैद्यकीय अधिकार्यांची संख्या वाढविण्याचे निर्देश द्यावेत अशीही मागणी आ. राम पाटील रातोळीकरांनी या निवेदनात केली आहे.
