समिती व सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी बहाणेबाजी करतेय – मनोज जरांगे पाटील
हदगाव| आमच्या अनेक पिढ्यांपासून आम्ही कुणबी मराठा आहोत. संबंधित समितीला आम्ही कुणबी मराठा असल्याचे पुरावे सापडत नाहीत. आरक्षण बनवायला पुराव्याचा आधार लागतो, असे समितीने सांगितले. त्यानंतर समिती हैदराबाद येथे गेली. तिथे मराठा कुणबी असल्याचे पाच हजार पुरावे समितीला सापडले. तरीही संबंधित समिती व सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी बहाणेबाजी करत आहे. असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी हदगाव येथील सभेत केला.
शेंबाळ पिंपरी (ता. पुसद) येथून तळणी मार्गे निवघा व नंतर हदगाव येताना मनोज जरांगे पाटील यांचा हदगाव तालुक्यातील तळणी, उमरी (भा.), निवघा (बा), धानोरा (रु.), रुई, मानवाडी फाटा, हडसणी, हरडफ येथे भव्यदिव्य सत्कार करण्यात आला. हदगाव येथे वाजत गाजत जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी करत जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले. निवघा (बा) येथे सकल मराठास माजाच्या वतीने आयोजित केलेल्या हदगाव येथील सुमन गार्डन मंगल कार्यालयात सभा घेण्यात आली. यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, आता सरकारने मराठा समाजाला सरसकट कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर मी ठाम आहे.
माझा समाज माझ्यासाठी माय बाप आहेआणि या माय बापाशी मी गद्दारी करणार नाही. राज्य सरकारने अंतरवाली सराटी येथील उपोषण व आंदोलन उठवण्यासाठी अनेक डावपेच रचूनआपल्याला नाहक त्रास दिल्याचेही यावेळी जरांगे पाटील म्हणाले. यापुढे मराठा आरक्षणासाठी शांततेत आंदोलन करा, उपोषण करा. पण कुठेही जाळपोळ, उद्रेक,रास्ता रोको,आत्महत्या करू नका. आपल्या न्याय्य हक्कासाठी शांततेने सरकारशी लढा देण्यासाठी येत्या १४ ऑक्टोबर रोजी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे प्रत्येक कुटुंबातील बांधवांनी यावे, असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केले.