नांदेड| स्वच्छ भारत अभियान ग्रामीण 2025 अंतर्गत सुरू असलेल्या देशव्यापी सर्वेक्षणात नांदेड जिल्ह्याचा सहभाग वाढवण्यासाठी नागरिकांना पुन्हा एकदा सक्रिय होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गाव पातळीवरील स्वच्छतेचे मूल्यमापन हे नागरिकांच्या थेट अभिप्रायावर आधारित असून, SBMSSG2025 हे अधिकृत ॲप त्यासाठी केंद्र सरकारने उपलब्ध करून दिले आहे.
या ॲपव्दारे नागरिकांना त्यांच्या गावातील शौचालय वापर, सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनासंबंधी फक्त 13 सोप्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. हे सर्वेक्षण केवळ दोन मिनिटांचा असून, प्रत्येक नागरिकाचा सहभाग गावाच्या रेटिंगवर प्रभाव टाकतो. यासाठी गट विकास अधिकारी, जिल्हयातील सर्वर प्राचार्य, आरोग्य अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी व जिल्हा परिषद विभागप्रमुख यांनी समन्वय साधून अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन करावे, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी दिले आहेत.
ॲप वापरण्याची प्रक्रिया: SBMSSG2025 ॲप गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करावे. त्यानंतर मोबाइल क्रमांक टाकून ओटीपीव्दारे लॉगिन करा. भाषा निवडा, राज्य, जिल्हा, गाव भरून सर्वेक्षण सुरू करा. त्यानंतर 13 प्रश्नांची उत्तरे देऊन सहभाग नोंदवा. या प्रक्रियेसाठी QR कोडही उपलब्ध असून, स्कॅन करून थेट डाऊनलोड करता येते. जिल्ह्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध समिती, महिला बचत गट, युवक, शिक्षक, उद्योजक आणि स्वयंसेवी संस्था यांनी या अभियानात भाग घेऊन गावासाठी अभिमानाची कामगिरी बजावावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
1000 गुणांवर मूल्यांकन करण्यात येणार
स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणसाठी स्वच्छते थेट 1000 गुणांच्या आधारे मुल्यांकन करण्यात येणार आहे. यामध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन 120 गुण, नागरिकांचा सहभाग व मानसिकता 100 गुण, स्वच्छता सुविधांचा वापर 240 गुण तर प्रत्यक्ष पाहणी व सर्वेक्षण प्रश्नावली 540 गुण आहेत.