ग्रामीण रुग्णालयासह परिसरातील चार रुग्णालयाचा हिमायतनगरचे तहसीलदार आदिनाथ शेंडे यांनी घेतला आढावा
हिमायतनगर,असद मौलाना| येथील ग्रामीण रुग्णालयासह परिसरातील चार रुग्णालयास हिमायतनगर येथील तहसीलदार आदिनाथ शेंडे, मुख्याधिकारी श्री तांडेवाड यांनी दि. १० ऑकटोबर रोजी भेट देऊन रुग्णालय परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी येथील रुग्णालयामध्ये असलेल्या आवश्यक गरजा आणि रुग्णांच्या सेवेत असलेल्या कमतरतांची नोंद घेतली गेली. या सर्व नोंदिचा आढावा वरिष्ठ पातळीवर पाठविला जाणार असून, त्यानंतर हिमायतनगर येथील रुग्णालयात इतर अत्यावश्यक सुविधा उपलब्ध होतील. अशी अपेक्षा आता हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला होऊ लागली आहे.
हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून, तालुक्यातील सरसम, चिंचोर्डी, आपला दवाखाना आणि हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयाला तहसीलदार आदिनाथ शेंडे यांनी आज सकाळपासून भेटी देऊन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या सूचनेनुसार रुग्णसेवेच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी रुग्णालयातील उपचार वार्ड, डिलिव्हरी रूम, ऑपरेशन थेटर आणि ईसीजी मशीन, ऑक्सिजन प्लांट तसेच रुग्णालय परिसरातील आतील आणि बाहेरील परिस्थितीचा देखील तासभर फिरून पाहणी केली. या दरम्यान काही ठिकाणच्या रुग्णालयात अस्वच्छता साफसफाईचा अभाव दिसून आल्याने याकडे लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना केल्या.
तसेच हिमायतनगर सह परिसरातील रुग्णालयामध्ये आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आजच्या तपासणीचा अहवाल पाठविण्यात येणार असल्याचे न्यूजफ्लॅश३६०डॉटईंन शी बोलताना सांगितले. यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांनी सफाई कर्मचारी नियुक्त करणे, शिशुगृह, सोनोग्राफी मशीन चालू करणे, रुग्णालयात येणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकासाठी बसण्याचे आसन व्यवस्था करणे, येथील रुग्णालयात अधिकारी कर्मचाऱ्यासह रुग्णांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कायमस्वरूपी करणे, तसेच सुरू असलेल्या इमारतीच्या कामाला गती देणे, रुग्णालय परिसरामध्ये सर्वत्र अंधार पसरला आहे हा अंधार दूर करण्यासाठी तातडीने रुग्णालयातील विजेची व्यवस्था उपलब्ध करून देणे. आदींसह विविध मागण्यांची नोंद मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार श्री तांडेवाड यांनी लिहून घेतली असून, या तपासणी भेटीनंतर हिमायतनगर रुग्णालयात आणखी जास्तीच्या सुविधा उपलब्ध होतील अशी अपेक्षा सर्वांना आहे.