
नांदेड| जागतिक वन दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘माझे झाड माझा जीव’ ही मूक नाटिका सादर केली. कुठलाही मंच अथवा कोणताही रंगमंच उपलब्ध नसताना शाळा परिसरातील झाडांमध्ये सादर केलेल्या मूक नाटिकेमुळे उपस्थित शिक्षक आणि विद्यार्थी गहिवरले.
यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, विषय शिक्षक उमाकांत बेंबडे, सहशिक्षक संतोष घटकार शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशनराव गच्चे, माता पालक संघाच्या अध्यक्षा मनीषा गच्चे, सरपंच प्रतिनिधी साहेबराव शिखरे, माजी सरपंच कैलास गोडबोले, आनंद गोडबोले, हरिदास पांचाळ, पांडूरंग गच्चे, कमलताई गच्चे, अमोल शिखरे, मंचक पाटील, मारोती चक्रधर, हैदर शेख आदींची उपस्थिती होती.
जागतिक वन दिवस हा दरवर्षी २१ मार्चला साजरा करण्यात येतो. संयुक्त राष्ट्र संघाने २८ नोव्हेंबर २०१२ ला जागतिक वन दिवस साजरा करण्याचा ठराव मंजुर केला. २१ मार्च २०१३ रोजी प्रथमच आंतरराष्ट्रीय वन दिन साजरा करण्यात आला. वनांचा मानवी जिवनाशी असलेला सरळ संबंध, जंगलावर अवलंबून असणारी प्राचीन औषध प्रणाली आणि सोबतच जंगलावर आपली उपजीविका भागवणाऱ्या जमाती आणि जैवविविधता याबाबत लोकांमध्ये जागरुकता पसरवण्यासाठी आणि जंगल निर्माण, संवर्धन आणि संरक्षणाच्या उद्देशांसाठी संयुक्त राष्ट्र संघाने २०१२ पासून २१ मार्च हा दिवस जागतिक वन दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले.
काल जागतिक वन दिनाचे औचित्य साधून या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये वृक्षारोपण, वनसंवर्धन या मूल्यांच्या रुजवणूकीबरोबरच वृक्षतोडीमुळे होणारे दुष्परिणाम तसेच वनांचे फायदे यांची योग्य माहिती व्हावी आणि शालेय जीवनातच हे संस्कार व्हावेत या उद्देशाने ‘माझे झाड माझा जीव’ या मूक नाटिकेचे लेखन व आयोजन मुख्याध्यापक ढवळे जी. एस. यांनी केले होते. या नाटिकेचे दिग्दर्शन उमाकांत बेंबडे यांनी तर नेपथ्य मारोती चक्रधर यांनी सांभाळले. या नाटिकेत पंचशील गच्चे, वैभवी शिखरे, कल्याणी शिखरे, तेजल शिखरे, वैभव ननुरे, सोनल गोडबोले, मयुरी गोडबोले, वीर गोडबोले, मारोती गोडबोले, नागेश मठपती, राजवर्धन गवारे यांनी सहभाग नोंदवला होता.
