धर्म-अध्यात्मनागपूर

दीक्षाभूमीवर सुरक्षा, आरोग्य व स्वच्छतेसंदर्भात प्रशासनाकडून आधुनिक सुविधा

नागपूर| दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांना उत्तम सुविधा देण्यासाठी जिल्हा व महानगरपालिका प्रशासनाने यावर्षी आधुनिक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. १०० डॅाक्टर २४ तास उपलब्ध असून ४ हजार पोलिस मदतीसाठी उपलब्ध आहेत. याशिवाय महानगरपालिकेने ठिकठिकाणी डिजिटल बोर्ड लावून सुविधांची माहिती दिली आहे. शौचालय, पिण्याचे पाणी, तात्पुरता निवारा रस्त्यावरची स्वच्छता या मूलभूत सुविधांसाठी १ हजार कर्मचारी पुढील ३ दिवस उपलब्ध असतील.

दीक्षाभूमीवर यावर्षी मोठ्या प्रमाणात अनुयायी येणार असल्याची शक्यता परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने वर्तवली आहे. एक दिवसाआधीच यावर्षी हजारो बांधव दर्शनासाठी दीक्षाभूमीवर पोहोचले आहेत. उद्या ही संख्या वाढण्याची शक्यता असून आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी २ तास दीक्षाभूमी परिसरातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी महानगर पालिकेसोबत पूरक व्यवस्था म्हणून आरोग्य उपसंचालक कार्यालयामध्ये आरोग्य शिबिराचे अधिकृत उद्घाटन केले. याठिकाणी २४ तास तज्ज्ञ डॅाक्टर उपलब्ध राहणार आहेत.

वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथील डॅाक्टर, निवासी डॅाक्टर यांची यासाठी तैनाती करण्यात आली आहे. याठिकाणी गंभीर रुग्णांपासून सर्वसामान्य आजारांपर्यंत उपचार, औषधोपचार करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. कांचन वानरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिन हा कायम परिवर्तनाचा दिशादर्शक उत्सव राहिला आहे. हा उत्सव यापुढे ‘प्लास्टिक फ्री झोन’ उपक्रम ठरावा. पिण्याचे पाणी, खानपान, अन्नदान, शौचालय अन्य कोणत्याही कामासाठी प्लास्टिकचा वापर कोणीच करू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!