नांदेड| अखिल भारतीय विद्यापीठ संघ आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘शतस्पंदन’ हा आंतर राज्यस्तरीय पश्चिम विभागीय युवा महोत्सव दि. २२ ते २६ जानेवारी या कालावधीमध्ये नुकताच नागपूर येथे संपन्न झाला.
या महोत्सवामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ३० विद्यार्थी कलावंतांनी एकूण १८ कला प्रकारांमध्ये आपले दमदार सादरीकरण केले. वांग्मय, नृत्य, नाट्य, संगीत व ललित कला या प्रकारामध्ये विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करून सुवर्णपदकासह स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच लोकसंगीत (फोक ऑर्केस्ट्रा) या कलाप्रकारात नैपुण्य मिळवत लुधियाना (पंजाब) येथे होणाऱ्या राष्ट्रीय महोत्सवासाठी आपली एन्ट्री पक्की केली आहे.
अर्जुन पवार या विद्यार्थ्यांने मिमिक्री मध्ये गोल्ड मेडल पटकावले. तर तालवाद्यमध्ये मुंजाजी शिंदे यांनी चतुर्थ क्रमांक प्राप्त केला आहे. एकूण १३ विद्यार्थी कलावंत राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी पात्र ठरले आहेत. मागील वर्षी ‘इंद्रधनुष्य’ या राज्यस्तरीय महोत्सवात आणि पश्चिम विभागीय युवा महोत्सवात विद्यापीठाच्या संघातील विद्यार्थी कलावंतांनी दमदार कामगिरी करून आपली स्वतंत्र नाममुद्रा उमटवली होती. ही समृद्ध परंपरा पुढे ठेवत विद्यापीठाचा संघ राष्ट्रीय युवा महोत्सवात आपली नाममुद्रा उमटवेल. असा आशावाद व्यक्त करत कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी संघाचे अभिनंदन केले.
याप्रसंगी विद्यापीठाच्या प्र -कुलगुरू डॉ. माधुरी देशपांडे, कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे , मा.व्यवस्थापन परिषद सदस्य हनुमंत कंधारकर, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक करून विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, संघ व्यवस्थापक डॉ. संदीप काळे, संगीत विभागाचे प्रशिक्षक डॉ. शिवराज शिंदे, सिद्धार्थ नागठाणकर, दिलीप डोंबे, डॉ. पांडुरंग पांचाळ, संघ व्यवस्थापिका डॉ. माधुरी पाटील यांना पुढील राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, वित्त व लेखाधिकारी डॉ. श्रीकांत अंधारे, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी यांनी संघाचे कौतुक केले. या महोत्सवासाठी कार्यालयीन कर्मचारी संभा कांबळे, बालाजी शिंदे, शिवाजी हुंडे, रामराव पतंगे, जीवन बारसे यांनी परिश्रम घेतले.