नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भूशास्त्र संकुलातील वरिष्ठ प्रा. डॉ. दिपक बाबुराव पानसकर, आस्थापना विभागातील सहा. अधिक्षक गोपा कोंडाजी बोखारे, पदव्युतर विभागातील वरिष्ठ लिपिक साजिदुल्लाखान मुस्तफाखान पठाण व वरिष्ठ लिपिक माणिक पिराजी राखोंडे आणि परीक्षा विभागातील ज्ञानोबा गुरुनाथ पवार हे पाचही कर्मचारी दि. ३१ मे रोजी नियतवयोमानुसार सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम दि. ३ जून रोजी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी पाचही सेवानिवृत्त सत्कारमूर्तींचे शाल, श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन सपत्नीक सत्कार केला. यावेळी प्र-कुलसचिव डॉ. डी.एम. खंदारे यांची व्यासपीठावर विशेष उपस्थिती होती.
प्रा. डॉ. दिपक पानसकर यांनी त्यांच्या कार्यकाळात विद्यापीठाला २७ वर्षे ९ महिने सेवा दिली आहे. या काळात त्यांनी प्रभारी कुलगुरू, संचालक बी.सी.यू.डी., विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता, भूशास्त्र संकुलाचे संचालक व विभाग प्रमुख, व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य, विद्यापरिषद सदस्य असे विविध पदे भूषविली आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत स्कॉटलंड, बँकोक थायलंड, अमेरिका हुस्टन, टूनेशिया व इजिप्त यासारख्या परदेशामध्ये शैक्षणिक संदर्भात भेटी दिल्या. डॉ. पानसकर यांनी विविध विद्यापीठामध्ये कुलगुरू पदासाठी १० वेळा पात्र होवून सर्च समितीसमोर मुलाखती दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण १७ विद्यार्थ्यांनी आपले संशोधन कार्य पूर्ण केले व सध्या २ विद्यार्थ्यांचे संशोधन कार्य चालू आहे. ५ विद्यार्थ्यांनी एम.फिल. संशोधन कार्य पूर्ण केले आहे.
एकूण ८५ विद्यार्थ्यांना त्यांनी एम.एस्सी. प्रोजेक्टवर मार्गदर्शन केले आहे. त्यांनी आतापर्यंत १४१.७४ लाख रु. प्रकल्प पूर्ण केले आहे. त्यांचे शोधनिबंध आंतरराष्ट्रीय ३५ आणि राष्ट्रीय ४४ असे एकूण ७९ शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचे एकूण ३ पुस्तके प्रकाशित झाले आहेत व २ पुस्तकांचे लिखाण चालू आहे. डॉ. पानसकर यांना विविध पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये महाराष्ट्र शासनाचे आदर्श शिक्षक पुरस्कार, राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार, विद्यापीठाचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार इ. आहेत.
सहा. अधिक्षक गोपा बोखारे हेही नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत. बोखारे यांनी कनिष्ठ लिपिक पदापासून ते सहा. अधिक्षक पदापर्यंतची अशी एकूण २८ वर्ष सेवा विद्यापीठास दिली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी परीक्षा विभाग, आस्थापना विभाग, विशेष कक्ष, पदव्युत्तर विभाग इ. विभागामध्ये आपली सेवा दिली. वरिष्ठ लिपिक पठाण हेही नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी एकूण २८ वर्ष सेवा विद्यापीठाला दिली आहे. त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये रसायनशास्त्र संकुल, परीक्षा विभाग, क्रीडा विभाग, पदव्युतर विभाग इ. विभागामध्ये सेवा दिली.
वरिष्ठ लिपिक राखोंडे हेही नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी एकूण २८ वर्ष सेवा विद्यापीठाला दिली आहे. त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये भौतिकशास्त्र संकुल, परीक्षा विभाग, आस्थापना विभाग, रसायनशास्त्र संकुल, शैक्षणिक विभाग, कुलसचिव कार्यालय व पदव्युतर विभाग इ. विभागामध्ये सेवा दिली. विद्यापीठातील कनिष्ठ लिपिक पवार हेही नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी एकूण २८ वर्ष सेवा विद्यापीठाला दिली आहे. त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये परीक्षा विभाग, क्रीडा विभाग, भांडार विभाग, पदव्युतर विभाग इ. विभागामध्ये सेवा दिली.
या समारंभ कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी या पाचही कर्मचाऱ्यास त्यांनी विद्यापीठास दिलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल कौतुक केले आणि त्यांना पुढील जीवन सुखीं, समृद्धी व आरोग्यमय लाभो अश्या शुभेच्छा दिल्या. प्र-कुलसचिव डॉ. डी.एम. खंदारे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून या सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास पुढील जीवन सुखीं, समृद्धी व आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मा. व्यवस्थापन परिषद सदस्य, मा. अधिसभा सदस्य, संविधानिक अधिकारी, संचालक यांच्यासह शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व कार्यक्रमास उपस्थित नातेवाईक यांनीही या सर्वांना पुढील जीवन सुखीं, समृद्धी व आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. राहुल चौधरी यांनी केले.