नांदेड। दिवाळी सणानिमित्त दररोज पाणीपुरवठा, बंद पथदिवे सुरू करणे व शहरातील खोदकामे बंद करण्याची मागणी भाजपाचे महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनी मनपाचे आयुक्त डॉ . महेशकुमार डोईफोडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
येत्या दोन दिवसांत दिवाळी सणाला प्रारंभ होणार असून शहराच्या विविध भागात अपुरा पाणीपुरवठा होत आहे.हिंदु धर्मात सर्वात मोठा दिवाळी सण असून दररोज नियमित पाणीपुरवठा करावा,शहराच्या विविध भागातील पथदिवे बंद आहेत.त्यामुळे शहराच्या विविध भागात अंधाराचे साम्राज्य आहे.दिवाळी सणानिमित्त नागरिक, महिला,मुली,बालके मोठ्या संख्येने बाजारपेठेत येत असल्याने त्यांना अंधाराचा फटका बसत असून अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे बंद असलेले पथदिवे सुरू करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
तसेच शहराच्या विविध भागात रस्त्यांची कामे सुरू आहेत.यासाठी रस्त्यावर खोदकाम करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात गिट्टी,साहित्य रस्त्यांच्या कडेला पडलेले आहे.त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत असून दररोज वाहतुकीची कोंडी होत आहे.वाहतुकीची कोंडी व वाहतूक सुरळीत पार पाडण्यासाठी दिवाळी सणापर्यंत रस्त्याची कामे बंद करावीत,अशी ही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.यावेळी भाजपा सरचिटणीस शितल खांडिल, दिलीपसिंग सोडी,युवा मोर्चा अध्यक्ष परमवीरसिंग मल्होत्रा, सोशल मीडिया प्रमुख राज यादव,प्रभाकर पेठकर, अमोल कुलथिया, राजकुमार पर्रे, अन्वर सादात,संजीव जिंदल ,अब्दुल वाहिद चावलवाला,हरीश लालवाणी, रवी सिंग खालसा, अजय डहाळे, सागर डहाळे,आदी उपस्थित होते.