नांदेड। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिके मार्फत विशेष कर वसूली मोहीम राबविण्यात येत आहे. माहे फेब्रुवारी अखेरीस गतवर्षीच्या तुलनेत (४०% शास्ती माफी योजना असतांनाही) मालमत्ता कर वसुलीत तब्बल ४.५० कोटींची वाढ व पाणीपट्टी कर वसुलीत सुध्दा ४.०० कोटीची वाढ झालेली आहे. तथापि, कर वसुलीचा शेवटचा मार्च महिना असल्याने मा.आयुक्त तथा प्रशासक डॉ महेशकुमार डोईफोडे यांनी आढावा घेऊन, पुढील दिवसांचे नियोजन सूचना दिल्या.
त्यानुसार ज्या मालमत्ता धारकांकडे वांरवार पाठपुरावा करुन सुध्दा त्यांच्याकडील थकीत मालमत्ता व पाणी कराचा भरणा करण्यास टाळाटाळ करीत आहेत त्यांच्यावर सक्त कार्यवाही करावी. तसेच चालू वर्षातील नागरिकांचा ही तात्काळ कर भरून घ्यावा अशा सूचना आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांनी दिल्या आहेत. त्यानुसार अति.आयुक्त गिरीश कदम, उपआयुक्त (महसूल) डॉ पंजाब खानसोळे यांचा मार्गदर्शन खाली कर विभागाने जय्यत तयारी केली आहे. त्यानुसार आता महानगरपालिकेने थकबाकीदारांची नांवे दि.५ मार्च २०२४ पासुन नावे जाहीर करण्याचे अंतिम केले आहे.
थकबाकीदारांची नांवे पेपर आणि मुख्य चौका मध्ये बॅनरवर लावण्यात येतील. यासोबतच ऑटोटोरिक्षा व्दारे वार्डामध्ये थकबाकिदारांच्या नांवाचे उदघोषण करण्यात येणार आहे. तसेच नियमित जप्ती कार्यवाही, नळ खंडित कार्यवाही अधिक तीव्र होणार आहे. त्याकरिता प्रत्येक झोन अंतर्गत जप्ती, वसुली पथकांची स्थापना करण्यात आली आहे. जप्ती केलेल्या मालमत्ताचा लिलाव प्रक्रियेस गती देण्यात येत आहे. तसेच थकबाकीदारांची वाहने जप्त करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. तसेच जे थकबाकीदार प्रतिसाद देत नाहीत त्यांच्या घरा समोर बँड बाजा पथक घेऊन सुद्धा वसुली केली जाणार आहे.
थकबाकीदारावर कार्यवाहीची मोहीम तीव्र करण्यासोबतच नागरिकांना कर भरण्यासाठी अधिकच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांनी दिल्या आहेत.त्यानुसार सुट्टीच्या दिवशी तसेच कार्यालयीन वेळे नंतरही कर स्विकारावा असे आदेश वसुली कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.
सोबतच तात्पुरते ६ कर संकलन केंद्र कार्यान्वित करण्यात येत असून ते सकाळी ८ ते १२ व दु.४ ते ८ या वेळात सुरू राहतील. त्यामुळे शहरातील नागरिकांना टॅक्स भरण्याच्या अधिकच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.जास्तीत जास्त नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने टॅक्स भरण्याचे मनपा तर्फे आव्हानं करण्यात येत आहे.सोबतच महानगर पालिका मुख्यालयात कॉल सेंटर कार्यान्वित करण्यात येत असून त्याद्वारे थकबाकीदारांना स्मरण देणे तसेच संपर्क साधण्याचे नियोजन करून अधिकाधिक मालमत्ता धारका पर्यंत पोचण्याचा कर विभागाचा प्रयत्न राहणार आहे.
वरील प्रमाणे महानगरपालिके मार्फत उपाययोजना आखण्यात आली असुन ही मालमत्ता धारकांसाठी शेवटची संधी असणार असल्याचा सज्जड इशारा दिला असुन थकबाकीदारांच्या नांवे जाहिर केल्याने होणारी नामुष्की टाळावी व कर भरुन महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन उपाआयुक्त (महसूल) डॉ.पंजाब खानसोळे यांनी केले आहे.