हिमायतनगर, दत्त शिराणे| पंचायत समिती अंतर्गत तालुक्यातील ग्रामीण भागातील गोरगरीब लाभार्थ्यांना शासनाकडून प्रधानमंत्री आवास घरकुल योजने अंतर्गत निवड करण्यात आली आहे. मात्र काही लाभार्थीना घरकुल बांधकामाचे देयके देण्यास अभियंत्यांकडून टाळाटाळ चालवली जात आहे. पंचायत समिती कार्यालयात चकरा मारूनही घरकुल बांधकामाचे अनुदान मिळत नसल्याने खडकी बा.येथील साहेबराव शेटे यांनी निवेदनाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड यांच्याकडे चौकशी मागणी केली आहे.
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेतून घर नसलेल्यांना पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घरकुल मंजूर करून त्याना लाभ दिला जातो. ग्रामीण भागात एका घरकुलाला 1 लाख 60 हजार रुपये शासनाकडून अनुदान दिले जाते. ग्रामीण भागातील कुटूंबांना घरकुल बांधकामासाठी लाभार्थ्यांची निवड ग्रामपंचायती मार्फत करण्यात येते. लाभार्थींना स्वत:च्या ३०० स्क्वेयर फूट जागेत बांधकाम करण्यासाठी सर्वसाधारण अटी लावून अर्थसहाय्य दिले जाते. त्यामुळे अनेकांनी या योजनेसाठी प्रस्ताव दाखल करून लाभ घेतला जात आहे. मंजूर झालेल्या अनेक लाभार्थ्यांना घरकुल बांधकामाचे पहिले धनादेश मिळाले आहेत.
परंतु बांधकाम पूर्ण झाल्यानंतरचे धनादेश देण्यास मात्र पंचायत समिती कार्यालयातील बांधकाम अभियंता यांच्याकडून टाळाटाळ केली जात आहे. जानेवारी २०२४ पासूनच्या नवीन घरकुल बांधकामाच अनुदान देण्याची मागणी खडकी बा.येथील साहेबराव शेटे यांनी एका निवेदनाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे केली आहे.
साहेबराव शेटे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे कि, अर्धवट बांधकाम असले तरी काही लाभधारकांना ठराविक रक्कम घेऊन बिले दिली गेली आहेत. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांची बिले देण्यासाठी मोठी आर्थिक लूट केली जात असल्याचे सांगितले आहे. अनेक गोरगरिबांच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याऐवजी सध्यातरी अर्धवट अवस्थेत राहिलेले आहे. बहुतांश घरकुलाचे कामे अर्धवट असल्यामुळे काही लाभार्थ्यांनी व्याजी दिडी करून घरकुलाचे काम पूर्ण करण्यासाठी धडपड करीत आहेत. येथील पंचायत समितीच्या साक्ष अभियंत्याने लाभधारकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट चालवली आहे. याची एका सक्षम अधिकाऱ्या मार्फत सखोल चौकशी करून गोरगरीब लाभधारकांना वेठीस धरणाऱ्या अभियंत्यासह त्यांना अभय देणाऱ्या गटविकास अधिकारी यांच्यावरही कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच घरकुलाच्या कामाची अनुदान दिवाळीपूर्वी देण्यात यावे अशी मागणी शेटे यांनी केली आहे. अन्यथा नाईलाजाने न्यायालयात याचिका दाखल करावी लागेल असा इशारा निवेदनातून दिला आहे. या निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी व संबंधित विभागाला दिल्या आहेत.