उस्माननगर, माणिक भिसे| राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक नाबार्ड व संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी संस्थेच्या माध्यमातून एकात्मिक पाणलोट विकास प्रकल्पांतर्गत काटकळंबा ता.कंधार येथे दिनांक 13 फेब्रुवारी रोजी नैसर्गिक शेती व्यवस्थापन या विषयावर एक दिवशीय प्रशिक्षण पार पडले.या प्रशिक्षणात विषमुक्त शेती हि काळाची गरज असल्याचे प्रतिपादन विश्वनाथराव होळगे नैसर्गिक शेती तज्ञ यांनी केले.
लोहा तालुक्यातील दापशेड येथील होळगे हे मागच्या 10 वर्षापासून सुभाष पाळेकर प्रेरित नैसर्गिक शेती करतात. होळगे यांनी नैसर्गिक शेतीविषयी स्वतःचे अनुभव सांगून सविस्तर मार्गदर्शन उपस्थित शेतकऱ्यांना केले. नैसर्गिक शेतीचे महत्व सांगतांना त्यांनी रासायनिक शेतीच्या दुष्परिणामाविषयी जागृत केले. आपण उत्पादन वाढीसाठी पिकाला रासायनिक खतांची गरजेपेक्षा अधिक मात्रा देतो.रासायनिक खताचां अधिक वापर केल्याेमुळे जमिनीचा पोत बिघडत आहे. किटकांचा नाश करणारी किटकनाशके अर्थातच विषारी असतात. त्यामुळे ज्याप्रमाणे उपद्रवकारक किटक मरतात त्याचप्रमाणे काही उपयुक्त जीवजंतूही बळी पडत आहेत.
जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी होत चालला असून यातून अपेक्षित उत्पादन कमी होत आहे. लागवड खर्च वाढल्यामुळे निव्वळ नफा सुद्धा कमी होत आहे. यामुळे शेती परवडत नाही म्हणून शेतकरी टाहो फोडत आहे. तसेच रासायनिक खताच्या व कीटकनाशकाच्या अतिवापरामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन कॅन्सर सारखे रोग होत आहेत. हे सर्व टाळण्यासाठी विषमुक्त शेती हि काळाची गरज आहे आहे असे मत नैसर्गिक शेती तज्ञ विश्वनाथराव होळगे यांनी यावेळी मांडले. गटशेतीच्या आधारे नैसर्गिक शेती करण्याबाबत माहिती देऊन त्यांनी जे भाजीपाला पिके व इतर पिकांचे मार्केटिंग कसे करायचे याची माहिती दिली.
संस्कृती संवर्धन मंडळ संस्थेचे नैसर्गिक शेती तज्ञ रवींद्र दशेटीवार यांनी रासायनिक शेती आणि नैसर्गिक शेती या दोन्ही मधील फरक सांगितले नैसर्गिक शेती मधील मुख्य चर घटकांची माहिती दिली.यामध्ये देशी गाईचे महत्व ,शून्य मशागत ,पिकांचे अवशेष ,हिरवळीच्या खताचे महत्व नैसर्गिक निविष्ठा घनजीवामृत, जीवामृत, बीजामृत, निमार्क, ब्रह्मास्त्र, दशपर्णी अर्क,अग्निअस्त्र, आंबटताक अर्क,सप्तधान्याकुंर अर्क इत्यादींचा वापर ,सेंद्रिय आच्छादनाचे महत्व ,जमिनीत वाफसा ठेवणे,वेगवेगळ्या पिकांचे आंतरपीक,मिश्र पिक पद्धती,बहुपीक पद्धती ,पिकाची फेरपालट याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. नैसर्गिक निविष्ठा घनजीवामृत, जीवामृत, बीजामृत, निमार्क, ब्रह्मास्त्र, दशपर्णी अर्क,अग्निअस्त्र,आंबटताक अर्क,सप्तधान्याकुंर अर्क,आच्छादन या नैसर्गिक निविष्ठा तयार करायचे प्रात्यक्षिक उपस्थित शेतकऱ्यांना दाखविले तसेच सदर निविष्ठा वापर करण्याच्या पद्धती सांगितले. नैसर्गिक शेती करताना आपण कोणतेही निविष्ठा कृषी सेवा केंद्रातून विकत न आणता गावराण गाईचे शेण,गोमुत्राचा वापर करून शेती कशी करायची याची माहिती दिली.
सदरील प्रशिक्षण कार्यक्रमास गावातील तेजेराव पानपट्टे, गोविंदराव वाकोरे,सुरेश बस्वदे,नागेश एकाळे, संजय पानपट्टे,नवाज जिलानी सय्यद, श्रीकांत रामकिशन बस्वदे, संजय बालाजी पानपट्टे, सय्यद दस्तगीर यासीनसाब तसेच महिला शेतकरी अनुसया व्यंकटी घंटेवाड ,कान्होपात्रा बस्वदे, गंगाबाई धर्मेकर,लक्ष्मीबाई तेलंग, सत्यभामा गाईतवाड,सुनीता बस्वदे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय भिसे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार गंगामणी श्रीगीरे यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्था कार्यकर्ते सय्यद इर्शाद,किशन जाधव,रामदास बस्वदे, तसेच चंद्रकांत बाबळे आदींनी परिश्रम घेतले..